मी विधानसभा अध्यक्ष होण्यास तयार, पण शिवसेनेनं वनमंत्रिपद सोडू नये; भास्कर जाधवांचं वक्तव्य

तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी होण्यास तयार असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे . मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच शिवसेनेनं ते स्वीकारावं. आधीच शिवसेनेकडे महत्वाची खाती नाहीत त्यामुळे शिवसेनेने वनमंत्रिपद सोडू नये, असं भास्कर जाधव म्हणाले.

    मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपदावरून वाद होताना दिसत आहेत. विधानसभेचं अध्यक्षपद सध्या काँग्रेसच्या खात्यात जरी असलं तरी अद्याप काँग्रेसला अध्यक्षपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेता आला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि उर्जामंत्री नितीन राऊत यांच्यात या पदासाठी चुरस असल्याचं सांगण्यात येत आहे.

    त्यामुळे आता हे अध्यक्षपद शिवसेनेकडे देण्यात येण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यावर आता भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिन्ही पक्षांनी मला विधानसभा अध्यक्ष केल्यास मी होण्यास तयार असल्याचंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे . मात्र त्या बदल्यात शिवसेनेने आपल्याकडचं वन मंत्रिपद सोडू नये, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला आहे.

    महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या एकमतानं विधानसभा अध्यक्षपद शिवसेनेला मिळत असेल तरच शिवसेनेनं ते स्वीकारावं. आधीच शिवसेनेकडे महत्वाची खाती नाहीत त्यामुळे शिवसेनेने वनमंत्रिपद सोडू नये, असं भास्कर जाधव म्हणाले. भास्कर जाधव जर अध्यक्ष झाले तर चांगल्या प्रकारे काम करतील, असं मत तिन्ही पक्षांचं मत झालं आहे. शिवसेनेनं आपल्या वाट्याचं वनमंत्रिपद देऊन अध्यक्षपद घेऊ नये, या मतावर मी ठाम असल्याचं देखील भास्कर जाधव यांनी म्हटलंय. कोणाला काय द्यावं, कोणाला कुठे बसवावं, हे तिन्ही पक्ष मिळून ठरवतात, असंही भास्कर जाधव म्हणाले.

    दरम्यान, केवळ दोन दिवसांच्या या अधिवेशनात तालिका अध्यक्षपदी नियुक्त केलेल्या भास्कर जाधव यांनी अधिवेशन गाजवलं होतं. त्यांनी भाजपच्या 12 आमदारांची विकेट काढली. तर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बाचाबाचीमुळे ते अधिवेशनानंतर देखील चर्चेत आले होते.