मी फोटोसेशनला नाही, दिलासा देण्यासाठी आलो; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,' तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधकांवर मुख्यमंत्र्यानी जोरदार निशाणा साधला आहे.

    मुंबई : आपण फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही असा टोला विरोधकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दौऱ्यावर आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्याची पाहणी केली असून जिल्हा प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेतला आहे.

    ‘मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,’ तसंच हेलिकॉप्टर नाही तर जमिनीवरुन पाहणी करत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधकांवर मुख्यमंत्र्यानी जोरदार निशाणा साधला आहे.

    मुख्यमंत्री म्हणाले की, ‘पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार’ मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले असून यासंदर्भात पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, हा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,’ असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिले आहे.