कर्मभूमी मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही : कंगना राणावत

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीर बरोबर केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतवर चहूबाजूंनी जोरदार टीका सुरु आहे. आपल्यावर होणाऱ्या टीकेला उत्तर देतानाच कंगनाने आता जय मुंबई, जय महाराष्ट्रचा नारा दिला आहे.

“महाराष्ट्रासह सर्वत्र असलेल्या मित्रपरिवाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यांना माझा हेतू माहित आहे. माझी कर्मभूमी असलेल्या मुंबईबद्दल मला प्रेम सिद्ध करण्याची गरज नाही. मुंबईला मी नेहमीच यशोदा मातेचा दर्जा दिला आहे. जय मुंबई, जय महाराष्ट्र असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

मुंबई पोलिसांबद्दल केलेले वक्तव्य तसेच मुंबईची पाकव्याप्त काश्मीर बरोबर केलेली तुलना यामुळे कंगनावर सध्या कला आणि राजकीय क्षेत्रातून जोरदार टीका होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या अभिनेत्री कंगना राणावतनं मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला नकार दिला होता. आपल्याला मुंबई पोलिसांचीच जास्त भीती वाटतेय, असं कंगना म्हणाली होती.

कंगनानं महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावलं होतं. तसंच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये असं ते म्हणाले होते. त्यानंतर आता कंगनानं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देताना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती.