हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही; नवाब मलिकांचा नारायण राणेंना टोला

आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रिय मंत्री झालो नाहीत. भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. भाजप बेजबाबदारपणे कृत्य करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

  मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. तुमच्यासारखे पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाहीत, असा जोरदार टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.

  मलिक नेमकं काय म्हणाले?

  आमच्यात हिंमत होती म्हणून आम्ही लढलो. कायदेशीर लढा जो आहे तो लढावा लागेल. पण आम्ही तुमच्यासारखे पक्ष सोडून आलो नाही. तुमच्यासारखे केंद्रिय मंत्री झालो नाहीत. भाजप केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करत आहे. त्यामुळेच ज्यांच्यात हिंमत नाही ते पक्ष सोडून भाजपमध्ये जात आहेत. भाजप बेजबाबदारपणे कृत्य करत आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

  अनिल परबांच्या नोटीसबाबत मलिकांची प्रतिक्रीया

  परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस आली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीची नोटीस येणं हे अपेक्षितच होतं. राणेंना अटक झाल्यानंतर तर ते अपेक्षितच होतं. परब यांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल. सूडबुद्धीने हे राजकारण सुरू आहे. याबाबत आता लोकांच्या मनात कसलीच शंका उरली नाही, असं त्यांनी मलिकांनी सांगितलं.

  दरम्यान यावेळी त्यांनी भाजपच्या मंदिर उघडण्याच्या आंदोलनावरही टीका केली. कोविडचा धोका आहे हे जनतेला कळत आहे. मोदी साहेब स्वत: सांगत आहेत तरी हे लोक ऐकत नाहीत. भाजप जनतेला धोका देत आहे. लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.