तीन कोटी सोडा मी एक रुपयाही खर्च केलेला नाही; धनंजय मुंडेंचा खुलासा

मुंबई : मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च होत असल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या वृत्तानंतर विरोधकांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे वृत्त फेटाळत या वृत्ताबाबत खुलासा केला आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. काही माध्यमांमध्ये मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर मोठा खर्च केल्याची बातमी येत आहे.त्यात मला मिळालेल्या चित्रकूट या निवासस्थानावर तीन कोटी रुपये खर्च केल्याचेही सांगण्यात येत आहे.मला या निवासस्थानाचा ताबा मिळून केवळ ८ दिवस झाले असून मी तेथे अद्याप एक रुपयाचा खर्च केला नाही’. असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

काही मंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांच्या एकूण ३१ बंगल्यांच्या डागडुजीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं निविदा काढल्या आहेत. मात्र, निविदा सादर होण्याआधीच कामाला सुरुवात झाली असल्याचे वृत्त प्रसारीत झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं शासकीय निवासस्थान वर्षासह इतर अनेक बंगल्यांचा समावेश आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मिळालेल्या चित्रकूट  या निवासस्थानावर ३ कोटी रुपयांचा खर्च झाल्याची चर्चा सुरु आहे. अखेर मुंडे यांनी ट्विट करत याबाबत खुलासा केला आहे.