“विद्यार्थ्यांना शिक्षण द्यायचयं , १२ तासासाठी टीव्ही तर २ तासासाठी रेडिओ द्या”

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे केंद्राला पत्र मुंबई: राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन शाळा सुरु होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे केंद्राला पत्र

मुंबई: राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांसाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन शाळा सुरु होण्यापेक्षा विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारच्या मालकीच्या दूरदर्शनच्या दोन चॅनेलवरवरील १२ तास आणि आकाशवाणी रेडियोवरील २ तासाचा वेळ शिक्षण देण्यासाठी द्यावा अशी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विभागाच्यावतीने एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केल्याची माहिती शिक्षण विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक ठिकाणी शालेय विद्यार्थी हे एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत. तर काहीजण त्यांच्या मुळ गावी गेलेले आहेत. त्यातच कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेदृष्टीने सर्वच ठिकाणी प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नाही. त्यामुळे जरी ऑनलाईन शिक्षण द्यायचे म्हटले तरी अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांकडे चांगले मोबाईल फोन, इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण सर्वच विद्यार्थ्यांपर्यत पोहोविता येत नाही. हेच शिक्षण टीव्ही आणि रेडिओच्या माध्यमातून दिल्यास त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होईल आणि शिक्षणही त्यांच्यापर्यत पोहोचेल असे त्यांनी सांगितले.

या कल्पनेनुसार टीव्हीवरून दररोज १२ तास विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा विचार आहे. तर रेडिओच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना २ तास शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही. त्यादृष्टीकोनातून राष्ट्रीयस्तरावरील दोन चॅनलवरील १२ तासाचा वेळ आणि आकाशवाणी रेडियोवरील २ तासाचा वेळ देण्याची मागणी केंद्र सरकारला पाठविलेल्या पत्रातून करण्यात आली आहे. हा वेळ दिल्यास संबधित विषयाचा शिक्षक टीव्ही आणि रेडियावरून आपला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवू शकेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर शिक्षक असल्याचे दिसू लागल्याने त्यांच्या शिक्षणातही खंड पडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात जवळपास १ लाख १३ हजार शाळा आहेत. त्यामध्ये जवळपास २.५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यापैकी १ कोटी १८ लाख विद्यार्थी हे ग्रामीण आणि आदीवासी भागातील असल्याचेही त्यांनी सांगितले.

शालेय विद्यार्थ्यांना टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी राज्यांनी माहिती व प्रसारण विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन केले होते. त्यानुसार राज्य सरकारने यासंदर्भात पत्र पाठविले असून सध्या सह्याद्रीवरून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गली गली सिम सिम हा कार्यक्रम चालविला जात आहे.

यासंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, साधारणत: चार दिवसांपूर्वी केंद्राला पत्र पाठविले असून त्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आले नाही. परंतु राज्याचे मुख्य सचिव आणि मी स्वत: केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोलणार आहोत. जर केंद्र सरकारने दूरदर्शन चॅनेल उपलब्ध करून न दिल्यास आम्ही खाजगी चॅनलवरून शिक्षण देण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. मात्र प्रामुख्याने आमचा भर हा दूरदर्शनवरच राहणार आहे.