मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते, त्यामुळे मला राग वगैरे काही नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खुलासा

काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते म्हणाले की, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते, त्यामुळे मला राग वगैरे काही नाही.

    मुंबई : काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना भेटले. पण या भेटीसाठी मला शरद पवारांचे निमंत्रणच नव्हते, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते म्हणाले की, मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते, त्यामुळे मला राग वगैरे काही नाही.  ते म्हणाले की, काँग्रेससोबत २०१४ मध्ये धोका झाला. त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी तुटली होती.

    मला राग वगैरे काही नाही

    मुंबईत पत्रकारांशी बोलताना पटोले म्हणाले की, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. पण मला पवारसाहेबांचे निमंत्रण नव्हते, की नानांना घेऊन या वगैरे, मला त्या भेटीची माहितीच नव्हती. आमचे नेते त्यांना भेटल्यावर मी विचारले, त्यावर त्यांनी मला सांगितले की ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा झाली. त्यामुळे मला राग वगैरे काही नाही. मी माझ्या पक्षाचे काम करतो, ते करताना जर कोणाला राग येत असेल तर मला काही अडचण होण्याचे कारण नाही.

    महाआघाडीत फेरबदल नाहीत

    पटोले म्हणाले की, महाआघाडीत कोणतेही फेरबदल सध्यातरी नाहीत. हायकंमाड जे निर्देश देतील त्यावर मी काम करतो. भाजपला पर्याय फक्त काँग्रेस आहे, ओबीसींचे आरक्षण भाजपने संपवले त्या विरोधात राज्यात आम्ही आंदोलन करणार आहोत, असे नाना पटोलेंनी सांगितले. मी माझ्या पक्षाचे काम करतो, २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष देशात सरकार बनवेल. पक्षाचे काम पक्ष करणार, सरकार सरकारचे काम करेल. मला भाजपवर अटॅक करायची जबाबदारी दिली, मी रोज भाजपच्या नितीवर हल्ले करत राहणार, असेही नाना पटोले म्हणाले.