सामना रंगला : आरोप करणाऱ्यांना भर चौकात जोड्याने मारीन; माकडउड्या मारणाऱ्यांना संजय राऊत यांनी सुनावले खडेबोल

तुमच्या सारख्या फडतूस लोकांनी आरोप करत बसावे आणि त्यातून पक्षाने वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या हे शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांविरोधात सातत्याने अनेक आरोप करताना दिसत आहेत.यावर आता शिवसेनेने देखील दंड थोपटले असून सोमय्यांविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्याची चाचपणी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी असे गंभीर आरोप करणाऱ्यांना जाहीर इशाराच दिला आहे. त्यांनी केलेले आरोप जर सिद्ध झाले नाहीत,तर ईडी कार्यालयासमोर जोड्याने मारणार, असा आक्रमक इशाराच संजय राऊत यांनी दिला. एका मुलाखतीत संजय राऊत यांनी आरोप करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबियांवर एका पाठोपाठ एक गंभीर आरोप केले आहेत. नुकताच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे शिवसेना याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले, “ज्या पद्दतीने ही जी मंडळी आहे,अफाट, बेफाट, तोंडफाट पद्धतीने जे आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदे फडकावतात आणि आरोप करतात. आमदार प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसेच मी आणि माझ्या कुटुंबाच्या बाबतीत हेच केले. त्यांच्यात हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवावे.

अब्रुनुकसानीचे खटले वगैरे ठीक आहे ते न्यायालयात जाईल. पण, आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारले नाही, तर माझे नाव संजय राऊत नाही, हे मी आधीच सांगितले आहे”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. तुमच्या सारख्या फडतूस लोकांनी आरोप करत बसावे आणि त्यातून पक्षाने वाईट प्रसिद्धी मिळवावी यासाठी राजकारण, समाजकारण आणि पत्रकारिता केली नाही, अशा शब्दांत त्यांनी खडसावले.

मला आणि माझ्या पक्षाला आमची प्रतिष्ठा महत्त्वाची आहे. ही कायद्याच्या पलीकडील भाषा नाही. जे कायद्याच्या पलीकडे असे वक्तव्य करत आहेत, त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? असा सवाल त्यांनी केला.

त्यांच्या पक्षाने सांगावे आमचा या व्यक्तीशी संबंध नाही. ही जी माकडे उड्या मारत आहेत त्यांच्याशी आमचा संबंध नाही हे त्यांनी सांगावे. तपास यंत्रणांनी आपला तपास जरूर करावा. मात्र हे जे बाहेर लोक आहेत त्यांच्याकडे ही खरी, खोटी जी माहिती येते. त्यामुळे समाजातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न ते करतात. अशावेळी बेकायदेशीर काम करणाऱ्या या लोकांना हे जे ब्लॅकमेलर्स आहेत, त्यांच्याविषयी कोणती भूमिका घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.