university of mumbai Final year examinations of Distance and Open Learning Institute (Idol) from today

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेदरम्यान पुस्तके दिली जातात. पण प्रवेश घेऊन महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना अजूनही पुस्तके उपलब्ध करण्यात आली नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. आयडॉलमध्ये पुस्तकांसाठी सतत फेऱ्या मारल्यानंतरही पुस्तके नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून देण्यात येते. त्यामुळे येत्या काही दिवसांत हाेणाऱ्या पहिल्या सत्र परीक्षेची तयारी कशी करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल मुळे नोकरी, व्यवसाय करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी वाट मिळते. आयडॉलच्या २०२०-२१ वर्षाच्या जुलै सत्राच्या प्रवेश प्रक्रियेला १२ ऑक्टोबरला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मान्यता देण्यात अाली हाेती. त्यानंतर काही दिवसांतच आयडॉलकडून प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन आयडॉलकडून प्रवेश प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत राबवण्यात आली. यंदा प्रथमच आयडॉलमध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत.

प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी हे पदवीस्तरावरील व एमए /एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए हे पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी यंदापासून सत्र पद्धत राबवण्यात येणार आहे. २०२०-२१ वर्षाच्या जुलै सत्रासाठी ५६ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सत्र परीक्षा सुरू होण्याची शक्यता असतानाही एकाही विद्यार्थ्याला अद्यापपर्यंत आयडॉलकडून एकही पुस्तक देण्यात अालेले नाहीये. तीन ते चार वेळा पुस्तकांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध नसल्याचे उत्तर प्रशासनाकडून दिले जाते. प्रवेश घेऊन महिन्यापेक्षा अधिक वेळ झाला तरी विद्यापीठाकडून पुस्तके देण्याबाबत दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे आगामी सत्र परीक्षेची तयारी कशी करायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांना बेस्ट बसमधील गर्दीचा सामना करत कलिना कॅम्पस गाठावे लागत आहे. मात्र पुस्तकांबाबत विद्यापीठ प्रशासन काहीही हालचाली करत नसल्याचे दिसून येते. बस, रिक्षा करून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून दिली जात नाहीये, यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची शक्यता असल्याचा आराेप युवासेना सिनेट सदस्य सुप्रिया करंडे यांनी केला आहे.

यंदापासून सत्र पद्धत राबवण्यात येणार आहे. त्यामुळे नव्याने पुस्तके छपाईसाठी पाठवण्यात आली आहे. पुस्तके छपाईचे काम सुरू असून लवकरच विद्यार्थ्यांना पुस्तके मिळतील असे मुंबई विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) विनोद माळाळे यांनी सांगीतले.