राज ठाकरेंवर खटला भरला जाणार असेल तर… मनसेचा इशारा

महाराष्ट्रात व्यापार करताना 'मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही' अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर खटला भरला जाणार असेल तर... असे म्हणत मनसेने एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

मुंबई : मराठी भाषेवरून (Marathi Language) पुन्हा एकदा मनसे (MNS) आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) यांच्यात वाद पेटला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहिम सुरु केली. यानंतर अ‍ॅमेझॉनने दिंडोशी कोर्टाकडून (Dindoshi Court) मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांना नोटीस बजावली. राज ठाकरे आणि मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यानंतर मनसे आक्रमक झाली आहे.

महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन काही ट्विट करण्यात आले आहेत. या पुढेही आपला लढा  सुरुच ठेवणार असल्याचे मनसेने ट्विटच्या माध्यामातून सप्ष्ट केले आहे.

व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला तर काहींनी चालढकल केली त्यात सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला असे मनसेने ट्विटमध्ये म्हंटले आहे.

पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना ‘मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही’ अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर खटला भरला जाणार असेल तर… असे म्हणत मनसेने एक प्रकारचा इशाराच दिला आहे.

महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय ह्याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल! असे ट्विट मध्ये नमूद करत मनसेने आपली मराठी भाषेबद्दलची भूमिका स्पष्ट केली आहे.