विरोधी पक्ष सोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं; संजय राऊतांचा टोला

राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. मेट्रो कारशेड अडकली आहे. त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं. आम्हाला या भेटीसाठी नेले असतं तर बरं झालं असतं, असं विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असं राऊत म्हणाले.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील एक शिष्टमंडळ काल (८ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे.

    विरोधी पक्षसोबत असल्यावरच मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. आज (९ जून) माध्यमांशी बोलताना राऊत यांनी टीका करत प्रश्न उपस्थित केला आहे. राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री काल दिल्लीत गेले होते. या भेटीकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं. मेट्रो कारशेड अडकली आहे. त्याबाबतची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यावरही सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवं. आम्हाला या भेटीसाठी नेले असतं तर बरं झालं असतं, असं विरोधक म्हणत आहे. विरोधी पक्षाला नेण्याने जर राज्याला मदत मिळत असेल तर तसं केंद्राने जाहीर करावं, असं राऊत म्हणाले.

    दरम्यान केंद्रात त्यांच्याच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे काही गोष्टी सरकारी असतात. त्या केंद्राकडे न्याव्या लागतात. केंद्राला राज्याच्या अडचणी सांगाव्या लागतात. विरोधी पक्षनेते जाणकार आहेत. याबाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सूचना द्यायला हव्यात, असं सांगतानाच राज्याच्या प्रश्नांवर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचं स्वागत आहे, असंही ते म्हणाले आहेत. तसेचं राऊत आजपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पक्ष वाढवणं गरजेचं आहे. त्यासाठी माझा दौरा सुरू आहे. इतर गोष्टी होतच राहतील, असं ते म्हणाले आहेत.