ईडीची पीडा त्यात भाजपचे दबावतंत्र; विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सदनात मतदान घेण्याची वेळ?

    मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दोन दिवस करायच्या कामकाजाची रणनिती ठरविण्याबाबत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आज प्रमुख मंत्र्याची वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या वेळी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकांसह, केंद्रीय कृषी कायद्याविरोधात मंजूर करायच्या सुधारणा विधेयकासह, अनेक विषयावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    कोरोनामुळे निवडणूक टळण्याची शक्यता

    राज्यात येत्या सप्ताहात होवू घातलेल्या राज्य विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडीची पुन्हा एकदा सत्वपरिक्षा होण्याची शक्यता असून यावेळी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी सदनात मतदान घेण्याची वेळ येवू शकते याबाबत वर्षा येथील बैठकीत रणनिती ठरण्याची शक्यता आहे. येत्या ३ आणि चार तारखेनंतर विधानसभा सदस्यांचे कोरोना अहवाल हाती येतील त्यानंतरच नेमके किती सदस्य हजर राहू शकतील याचा तपशील उपलब्ध होणार आहे. पुरेश्या संख्याबळा इतके सदस्य हजर राहू शकणार नसतील तर या सत्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक टळण्याची शक्यता राष्ट्रवादीचे नेते नबाब मलिक यानी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

    निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न

    मागील काही वर्षापासून विधानसभा अध्यक्षांची निवड ही बिनविरोध करण्याची परंपरा राहिली आहे. महत्वाचे म्हणजे भाजप सोबत ईडी प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या पक्षांचे संबंध ताणले गेले असताना ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता नाही. या पार्श्वभुमीवर या पदासाठी निवडणुक होवून मतदान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तीनही पक्षांनी आपल्या सदस्यांना आणि सहयोगी पक्षांना पक्षादेश काढण्याचे फर्मान सोडले असून प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर  आघाडीच्या आमदारांच्या मनात चलबिचल असल्याने भाजप कडूनही दबावतंत्र वापरले जाण्याचे मानले जात आहे.

    आघाडीकडे १७१ इतके संख्याबळ

    त्यामुळे संख्याबळाचा विचार करता शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५३,आणि काँग्रेस ४३ असे तीन पक्षाचे १५२ बहुमत आहे. मात्र त्यात महाविकास आघाडीला पाठिंबा असलेले पक्ष बहुजन विकास आघाडी  ३, समाजवादी पार्टी २, प्रहार जनशक्ती पार्टी २ माकप शेकाप स्वाभिमानी पक्ष क्रांतिकारी शेतकरी पार्टी यांचा प्रत्येकी १ सदस्य आहे त्यामुळे संख्याबळ १६३ होते. त्याशिवाय आठ अपक्षांना सोबत घेवून आघाडीकडे १७१ इतके संख्याबळ आहे. तर विरोधकांकडे भाजपचे १०६, जनसुराज्य शक्ती, राष्ट्रीय समाज पक्ष यांचे प्रत्येकी १ आणि पाच अपक्ष असे  एकूण ११३चे संख्याबळ आहे. तर मनसे आणि एम आय एमचे २ असे एकूण ३ सदस्य  तटस्थ राहण्याची शक्यता आहे.