If Sharad Pawar becomes the president of UPA, it is a matter of happiness for us, Sanjay Raut's big statement

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व केल्यास आमच्यासाठी ते आनंदाचीच बाब आहे. विरोधकांनी एकत्र येऊन युपीएला बळकटी देण्याची गरज असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना (NCP Chief Sharad Pawar ) युपीएचे अध्यक्षपद देण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शरद पवार हे दिल्लीमध्ये बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याचदरम्यान त्यांच्यावर युपीएचीही (UPA) जबाबदारी देणार असल्याच्या चर्चांणा उधाण आले आहे. परंतु युपीएचे नेतृत्व करणार यामध्ये तथ्य नाही असे शरद पवार स्वतः म्हणाले आहेत. यावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपली प्रतिक्रीया दिली आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी युपीएचे नेतृत्व केल्यास आमच्यासाठी ते आनंदाचीच बाब आहे. विरोधकांनी एकत्र येऊन युपीएला बळकटी देण्याची गरज असल्याचं मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेना युपीएचा घटक नाही. त्यामुळे शरद पवारांनी काय निर्णय घ्यावा यावर मी भाष्य करणे योग्य नाही. या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर बोलणं योग्य ठरेल. परंतु त्यांच्या नावाची युपीएच्या अध्यक्षपदासाठी घोषणा झाल्यास आमच्यासाठीही ती आनंदाचीच बाब आहे.

शरद पवार यांनी युपीएच्या अध्यक्षपदाच्या बातमीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. असे मला समजले आहे. जर त्यांना अधिकृतपणे प्रस्ताव आल्यास आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आताच्या घडीला काँग्रेस देशाच्या राजकारणात कमकुवत झाली आहे. त्यामुळे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन युपीएला ताकद देण्याची गरज आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

सत्ताधारी भाजपविरोधात युपीएला बळकट करण्यासाठी तसेच युपीएचे अध्यक्षपदावरुन सोनिया गांधींनी राजीनामा दिल्यामुळे शरद पवारांच्या नावाचा विचार केला जात असल्याचा समजत आहे. शरद पवार यांनी पूर्वीही केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून काम केले आहे.