पदे रिक्त तर उमेदवारांची नियुक्ती का नाही? रेल्वे प्रशासनाला उच्च न्यायालयाने फटकारले

रेल्वे भरतीमध्ये गुणवत्ता यादी तयार न करता उमेदवारांना वगळण्यात आल्याचे निदर्शनास येताच मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश असताना यादीच न करता उमेदवारांना अपात्र कोणत्या निकषांवर ठरविले.

    मुंबई (Mumbai). रेल्वे भरतीमध्ये गुणवत्ता यादी तयार न करता उमेदवारांना वगळण्यात आल्याचे निदर्शनास येताच मुंबई उच्च न्यायालयाने संताप व्यक्त करत रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. गुणवत्ता यादी तयार करण्याचे निर्देश असताना यादीच न करता उमेदवारांना अपात्र कोणत्या निकषांवर ठरविले. तसेच इतर उमेदवारांच्या नियुक्ता कोणत्या निकषावर करण्यात आल्या आणि जर सुमारे 1065 जागा रिक्त आहेत तर मग 380 उमेदवारांची नियुक्ती का केले नाही असे सवाल उपस्थित करत न्यायालयाने रेल्वे प्रशासनासला चांगलेच सुनावले.

    या संदर्भात दोन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. मध्य रेल्वेने 2007 साली मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये चतुर्थश्रेणी पदांसाठी सुमारे 6413 जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार 2011 मध्ये निवड प्रक्रिया पार पडली. निवड प्रक्रियेनंतर उर्त्तीण उमेदवारांची वैद्यकीय चाचणी पार पडली. मात्र, रेल्वे प्रशासनाने गुणवत्ता यादी तयार न करता अन्य उमेदवारांची नियुक्ती करून भरती प्रकिया पूर्ण केली. रेल्वे प्रशासनाच्या या गौडबंगालाला आक्षेप घेत योगेश पाटील, ज्ञानेश्‍वर शिंदे याच्यांसह सुमारे 300 उमेदवारांच्या वतीने अ‍ॅड. एम.पी वशी, अ‍ॅड. विजय कुरले, अ‍ॅड. निलेश ओझा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

    त्यावर शुक्रवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घेत खंडपीठाने रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ काराभारावर ताशेरे ओढले. प्रत्येक सुनावणीदरम्यान सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून तुम्ही किती बेफीकीर आणि बेजबाबदार आहात हे न्यायालयाला दाखवून दिले असल्याचेही न्यायालयाने सुनावले आणि रेल्वे प्रशासानाच्या भरती प्रक्रिया विभागाच्या अध्यक्षांना संदर्भात दोन आठवड्यात सविस्तर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तीन आठवड्यांसाठी तहकूब केली.

    पात्रता निकषांवर सवाल
    सर्व परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना का डावलण्यात आले. गुणवत्‍ता यादी तयार न करता पात्र आणि अपात्र उमेदवार कसे ठरविले. अन्य उमेदवारांना नियुक्त कसे करण्यात आले. सदर पदासाठी आठवी पास पात्रता असतानाही 12 वी पास असलेले प्रमाणपत्र जोडलेले आणि दहावीचे प्रमाणपत्र जोडले नाही म्हणून अपात्र कसे ठरविले. आठवी पास झाल्याशिवाय तो उमेदवार 12वी पास झाला का? असा सवाल उपस्थित करून न्यायालयाने रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले.