anil deshmukh

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर देशमुख यांचा ज्ञानेश्वरी बंगला आणि अन्य १० ठिकाणी सीबीआयने छापेही मारले. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे आहे.

    मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यानंतर देशमुख यांचा ज्ञानेश्वरी बंगला आणि अन्य १० ठिकाणी सीबीआयने छापेही मारले. १०० कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे आहे.

    सीबीआयद्वारे देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार लटकली आहे. प्रारंभिक चौकशी पूर्ण झाल्यानंतरच सीबीआयने छापामार कारवाई केली आहे. या छाप्यात जर सीबीआयच्या हाती पुरावे लागले तर मात्र देशमुख यांची पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता आहे.

    याच पुराव्यांच्या आधारावर देशमुख यांना अटक होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठोस पुराव्यांविना देशमुख यांना अटक करणे सीबीआयसाठीही सोपे नाही. त्यामुळेच सीबीआयही सावध पावले उचलत आहे.

    सीबीआयने ११ तास चौकशी केली होती. त्या चौकशीच्या आधारावर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केलेला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यातच आता ईडी देखील देशमुखांच्या मालमत्तेवर धाड टाकणार असल्याची महिती सुत्रांकडून मिळाली आहे. तब्बल १०० कोटींचा आरोप असल्याने ईडी देखील यात हस्तक्षेप करणार असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.