भान ठेवून बोललं तर असे प्रसंगच येणार नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नारायण राणेंना टोला

‘प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना मंत्रीपत्र मिळालं. त्यानंतर वरुन आदेश मिळाले की जावा फिरा. आता वरुन आदेश मिळालेत म्हणल्यावर फिरणं भागच आहे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर. वास्तविक सोशल मीडियावर लोक काय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ते पाहा. कारण, नसताना वेगळं, प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते ना, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेलं आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर राणेंना झालेली अटक व सुटका, यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापत चाललं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. दरम्यान अशावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणेंना खोचक टोला लगावला. तसंच प्रत्येकानं भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते, अशी टीकाही अजित पवार यांनी केली आहे.

    अजित पवार नेमकं काय म्हणाले?

    राज्यात सुरु असलेल्या आरोप प्रत्यारोपांपेक्षा राणेंनी त्यांच्या खात्याकडून राज्यासाठी निधी आणला तर योग्य राहिल, तुम्ही काय सांगाल? असा प्रश्न एका पत्रकाराने अजित पवार यांना विचारला त्यावर ‘सुक्ष्म आणि लहानमध्ये काय निधी मिळणार आहे? निधी द्यायचा झाला तर गडकरी साहेबांचा विभाग देऊ शकतं. गडकरींनी यापूर्वीही दिला आहे. कामंही चाललेली आहेत. सध्या कोरोनाचं संकट असल्यामुळे सुक्ष्म आणि लघू असे उद्योग खूप अडचणीत आले आहेत. देशपातळीवर याबाबत मोठा निर्णय घेता येत असावा. तुम्हाला आठवत असेल की कोरोनाच्या पहिल्या लाटेत अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 25 लाख कोटीचं पॅकेज दिलं होतं. त्यात किती फायदा झाला, झाला की नाही? हा संशोधनाचा भाग आहे’, असं खोचक उत्तर अजित पवार यांनी दिलं.

    भान ठेवून वक्तव्य केली पाहिजेत

    तसंच ‘प्रत्येकाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. या चौघांना मंत्रीपत्र मिळालं. त्यानंतर वरुन आदेश मिळाले की जावा फिरा. आता वरुन आदेश मिळालेत म्हणल्यावर फिरणं भागच आहे वरिष्ठांनी सांगितल्यानंतर. वास्तविक सोशल मीडियावर लोक काय प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत ते पाहा. कारण, नसताना वेगळं, प्रत्येकाने भान ठेवून वक्तव्य केली तर असे प्रसंगच आले नसते ना. इतरांनीही मागे काही वक्तव्य केली पण तेव्हा त्यांनी शपथ घेतली नव्हती. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर एक जबाबदार व्यक्ती म्हणून बोललं पाहिजे. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन पावलं उचलावी लागतात. निर्णय घ्यावे लागतात. लोकांना, सगळ्यांना न्याय द्यावा लागतो’, असा टोलाही अजित पवारांनी राणेंना लगावला आहे.