…जर आंदोलनच करायचे असेल तर मोदी शहांच्या घरासमोर करा : संजय लाखे पाटील

माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेशाचे गुणगान गात आहेत हा महाराष्ट्रद्रोह आहे. कोरोनाची परिस्थिती महाविकास आघाडी सरकारने उत्तम रितीने हाताळली आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी जाहीरपणे सांगितले आहे. हे कदाचित निलंगेकर यांना माहित नसावे. उत्तर प्रदेशात गंगा नदीत तरंगणारे मृतदेह सर्व जगाने पाहिले आहेत.

  मुंबई : मराठा समाजाला खरेच त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळावे अशी भाजपाची प्रामाणिक इच्छा असती तर फडणवीस सरकारने दावा केलेले ‘फुलप्रुफ’ आरक्षण सुप्रीम कोर्टात का टिकले नाही? याचे उत्तर भाजपाचे नेते व माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी द्यावे आणि आरक्षणासाठी आंदोलन करायचे असेल तर भाजप नेत्यांनी मोदी-शहांच्या घरासमोर करावे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांनी केली आहे.

  मोदी फडणवीसांच्या पापावर पांघरूण

  यासंदर्भात लाखे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने आरक्षणासाठी मोठा संघर्ष केला आहे. राज्यात शांततापूर्ण ५८ मोर्चे काढले तसेच आपल्या हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी चाललेल्या संघर्षात ५० तरुणांनी बलिदान दिले. मात्र भारतीय जनता पक्षाला आरक्षणावरून केवळ राजकारण करायचे असून सुप्रीम कोर्टात आरक्षण रद्द झाल्याचे खापर मविआ सरकारवर फोडून मोदी फडणवीसांच्या पापावर पांघरून घालण्याचे पाप भाजप नेते करत आहेत.

  १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार नाहीत हे सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारनेच सांगितले आहे. त्यामुळेच आता मराठा आरक्षण हे केवळ केंद्र सरकारच्या अखत्यारीत असताना निलंगेकर हे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांना घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न का करत नाहीत? अजूनही वेळ गेलेली नाही त्यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळवून देण्याची धमक दाखवावी.

  अधिकार फक्त राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला

  लोकशाहीमध्ये हक्क कसे मिळवायचे याचे मार्ग ठरवून दिले आहेत. ५० टक्क्यांच्या वरील आरक्षण घटनाबाह्य ठरवल्याने संविधानपीठापुढे सुनावणी होणे किंवा केंद्र सरकारने कायदा करून इंदिरा साहनी खटल्यात घातलेली मर्यादा हटवणे हे मार्ग आहेत. १०२ व्या घटनादुस्तीनंतर मागास प्रवर्ग ठरवण्याचे राज्यांचे अधिकार ठरवण्याचे अधिकार केंद्राने काढून घेतले आहेत.

  SEBC मध्ये कोणाला समाविष्ट करायचे हे ठरवण्याचे अधिकार आता फक्त राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला आहे. २०१८ पासून भाजप सरकारने याबाबत कारवाई का केली नाही, याचे उत्तर संभाजी पाटील निलंगेकर यांनी द्यावे.

  खासदार केले ही भाजपाची भाषा उपकाराची

  संभाजीराजे छत्रपती हे खासदार आहेत,  त्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची चारवेळा भेट मागितली तरी मोदींनी त्यांना भेट दिली नाही हा मराठा समाजाचा अपमान नाही का?  संभाजीराजे यांना खासदार केले ही भाजपाची भाषा उपकार केल्याची आहे. छत्रपतींचा असा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही.

  संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा

  माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे महाराष्ट्रात राहून उत्तर प्रदेशाचे गुणगान गात आहेत हा महाराष्ट्रद्रोह आहे. कोरोनाची परिस्थिती महाविकास आघाडी सरकारने उत्तम रितीने हाताळली आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी जाहीरपणे सांगितले आहे. हे कदाचित निलंगेकर यांना माहित नसावे. उत्तर प्रदेशात गंगा नदीत तरंगणारे मृतदेह सर्व जगाने पाहिले आहेत.

  उत्तर प्रदेश, गुजरात या भाजपाशासित राज्यासारखे महाराष्ट्रात कोरोनासंदर्भातील कोणतीच आकडेवारी लपवली जात नाही हे निट अभ्यास करून पहावे व नंतरच निलंगेकर यांनी बोलावे. रस्त्यावर उतरून आंदोलन करुन कोरोना पसरवण्यापेक्षा संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, असेही लाखे पाटील म्हणाले.