आयआयटीचे माजी विद्यार्थी उभारणार वर्ल्ड क्लास हॉस्टेल !

दोन दशकामध्ये आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांहून १० हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. तसेच जुन्या वसतीगृहांची अवस्था बिकट झाली असून, त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र आयआयटीकडे असलेल्या पुरेशा निधी उपलब्ध नसल्याने दुरुस्तीमधील अडथळा ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची उत्तम सोय करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

    मुंबई : आयआयटी मुंबईच्या आवारात असलेल्या जुन्या हाॅस्टेलची अवस्था दयनीय झाली आहे. हाॅस्टेलची दुरुस्ती करण्यात आर्थिक चणचण भासत आहे, ही बाबत लक्षात घेत माजी विद्यार्थ्यांची संघटना असलेल्या आयआयटी मुंबई अ‍ॅल्युमनी असोसिएशन (आयआयटीबीएए) आणि आयआयटी मुंबई हेरिटेज फाऊंडेशन (आयआयटीबीएचएफ) यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आयआयटी मुंबईच्या परिसरात जागतिक दर्जाचे हॉस्टेल उभारण्याची जबाबदारी घेतली आहे. यासंदर्भात या दोन्ही संघटनांनी नुकताच आयआयटी मुंबईसोबत करारही केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

    दोन दशकामध्ये आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांहून १० हजारांच्या पार गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकता आहे. तसेच जुन्या वसतीगृहांची अवस्था बिकट झाली असून, त्यांची पुनर्बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र आयआयटीकडे असलेल्या पुरेशा निधी उपलब्ध नसल्याने दुरुस्तीमधील अडथळा ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची उत्तम सोय करण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे.

    आयआयटी मुंबईच्या परिसरातील पवई तलावाच्या बाजूला असलेल्या एच७ व एच ८ या हॉस्टेलच्या जागी नवे अद्ययावत हॉस्टेल उभारण्यात येणार आहे. हॉस्टेल उभारणीसाठी लागणारा १२० ते १३५ कोटींच्या निधीची तरतूद माजी विद्यार्थी करणार आहेत. या हॉस्टेलची निर्मिती, त्यासाठीचा निधी, प्लॅनिंग अशी सर्व जबाबदारी माजी विद्यार्थ्यांनी उचलली आहे. कॅम्पसमध्ये असलेले एच७, एच८, एच१०, एच११ हे हॉस्टेल सर्व आयआयटी विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या घरासारखे आहेत. त्यामुळे आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन हे हॉस्टेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अन्य विद्यार्थ्यांनाही पुढे येण्याचे आवाहन केल्याचे १९९३ च्या बॅचचे माजी विद्यार्थी सुधीर निकम यांनी सांगितले.

    आमच्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा पुरवण्यामध्ये आमचा हातभार लागत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. देशातील उत्तम संस्थांपैकी असलेल्या आयआयटी मुंबईचा दर्जा कायम ठेवण्याचे आमचे प्रयत्न असल्याचे आयआयटी मुंबई अ‍ॅल्यमनी असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नायक यांनी सांगितले.