राष्ट्रीय संस्था मूल्यांकनामध्ये आयआयटी मद्रास अग्रेसर

१०० मध्ये राज्यातील सात संस्था ; विद्यापीठ गटात मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर मुंबई : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय संस्था मूल्यांकन २०२० ची यादी

१०० मध्ये राज्यातील सात संस्था ; विद्यापीठ गटात मुंबई विद्यापीठ ६५ व्या स्थानावर  

मुंबई : भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे  राष्ट्रीय संस्था मूल्यांकन २०२० ची यादी जाहीर करण्यात आली. नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्कमार्फत (एनआयआरएफ) देशातील उच्च शिक्षण देणाऱ्या उत्कृष्ट शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठांची यादी यंदा प्रथमच १० विभागांमध्ये जाहीर करण्यात आली.  यामध्ये विद्यापीठ, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, फार्मसी, कॉलेज, वैद्यकीय, विधी, आर्किटेक्चर आणि दंत या विभागांचा समावेश होता.

एनआयआरएफतर्फे जाहीर केलेल्या या क्रमवारीत आयआयटी मद्रासने सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये अव्वल क्रमांक पटकावण्याबरोबरच अभियांत्रिकी गटातही अव्वल स्थान मिळवले. पहिल्या १० मध्ये सात क्रमांक हे आयआयटी संस्थांनी पटकावत अग्रसर राहील आहे.

संपूर्ण देशातून आयआयटी मद्रासने सर्वच शैक्षणिक संस्थांमध्ये अव्वल क्रमांक पटकाला. त्याखोलखल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व आयआयटी दिल्लीने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला. तर आयआयटी मुंबईने चौथा क्रमांक पटकावत महाराष्ट्राचा मान राखला आहे. त्याचप्रमाणे पुणे विद्यापीठाने १९ वा आणि पुण्याच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चने २५ वा क्रमांक पटकावला आहे.

त्याचप्रमाणे मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटने ३० वा, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ३४, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ५७ व क्रमांक पटकावला. मात्र मुंबई विद्यापीठाला पहिल्या १०० मध्येही स्थान मिळवता आले नाही. याउलट मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी या संस्थेने ९२ वा क्रमांक पटकावला. 

मात्र विद्यापीठ गटामध्ये मुंबई विद्यापीठाने ६५ वा क्रमांक पटकावला आहे. अभियांत्रिकी गटामध्ये आयाती मद्रासने आपले अव्वल स्थान कायम ठेवले तर आयआयटी मुंबईने तिसरा क्रमांक पटकावला आहे.   

मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांच्या हस्ते  व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे व्हर्च्युली ही यादी जाहीर करण्यात आली. यावेळी मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे, उच्च शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव राकेश रंजन, यूजीसी अध्यक्ष डी. पी. सिंग, एआयसीटीई अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, एनबीए अध्यक्ष के.के. अगरवाल आदी उपस्थित होते.

देशातील उच्च शिक्षण क्षेत्रातील संस्थांची यादी जाहीर करण्याची ही पाचवी वेळ आहे. यावेळी प्रथमच यामध्ये दंत विभाग हा नव्याने दाखल करण्यात आला.शिकवणी, शिक्षण आणि संसाधने, संशोधन आणि प्रात्यक्षिक, पदवी घेणारे विद्यार्थी, व्याप्ती आणि समावेशक आणि समाज या तत्त्वांच्या आधारे ही क्रमवारी ठरवण्यात आली. 

या क्रमवारीसाठी देशभरातून ५८०५ शैक्षणिक संस्थांचे अर्ज आले होते त्यातून ३७७१ यांची निवड झाली. त्यामध्ये २९४ विद्यापीठे, १०७१ अभियांत्रीकी कॉलेज, ६३० व्यवस्थापन संस्था, ३३४ फार्मसी कॉलेज, ९७ विधी कॉलेज, ११८ मेडिकल कॉलेज, ४८ आर्किटेक्चर कॉलेज, आणि १६५९ सर्वसामान्य कॉलेजांचा समावेश आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या यादीमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. २०१९ मध्ये ४८७३ अर्ज आले असताना त्यात २०२० मध्ये वाढ होऊन ५८०५ अर्ज आले तसेच २०१९ मध्ये ३१२७ संस्थांची निवड झाली तर २०२० साठी ३७७१ संस्थांची निवड झाली. 

-पालिकेच्या नायर डेंटल कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी 

राष्ट्रीय संस्था मूल्यांकनामध्ये मुंबई महापालिकेच्या नायर डेंटल कॉलेजने उत्कृष्ट कामगिरी करत आठवा क्रमांक पटकावला आहे. नायर डेंटल कॉलेजने ६४.५४ गुण मिळवत हा क्रमांक पटकावल्याने मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. नायर डेंटल कॉलेजबरोबरच पुण्याच्या डी. वाय. पाटील विद्यापीठाने ७६.३७ गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे डेंटल कॉलेज गटामध्ये पहिल्या १० मध्ये महाराष्ट्रातील दोन कॉलेजचा समावेश झाला आहे.