IIT project for oxygen

ऑक्सिजन तुटवड्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आयआयटी मुंबईतील (IIT mumbai expert found solution for oxygen shortage) तज्ज्ञांनी अभिनव उपाय शोधला आहे.

  मुंबई : देशात कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनचा तुटवडा(oxygen shortage) जाणवत असल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावे लागत आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी आयआयटी मुंबईतील (IIT mumbai expert found solution for oxygen shortage) तज्ज्ञांनी अभिनव उपाय शोधला आहे. यामध्ये नायट्रोजन युनिटचे ऑक्सिजन युनिटमध्ये(Oxygen unit created by IIT mumbai experts) रुपातंर करणारी प्रेशर स्विंग एबसॉरप्शन (पीएसए) ही चाचणी यशस्वी केली आहे. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प सामान्य तांत्रिक क्लृप्तीवर आधारित आहे. प्रयोगासाठीची ही रचना तीन दिवसात विकसित करण्यात आली आहे.

  आयआयटी मुंबईने केलेल्या प्रेशर स्विंग एबसॉरप्शन (पीएसए) चाचण्यांमध्ये ३.५ एटीएम इतक्या दाबाने ९३ ते ९६ टक्के शुद्धतेच्या स्तरासह ऑक्सिजन उत्पादन साध्य करता येते. या ऑक्सिजन वायूचा उपयोग कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा अविरत पुरवठ्यासाठी केला जाऊ शकतो. सध्या अस्तित्वात असलेल्या नायट्रोजन संयंत्र रचनेची योग्य जुळवाजुळव आणि कार्बन ते झोलाइटमधील रेण्वीय चाळणी बदलून नायट्रोजनचे ऑक्सिजनमध्ये रुपांतर करणे शक्य आहे.

  यासाठी कच्चा माल म्हणून वातावरणातील हवा शोषून घेणारी नायट्रोजन संयंत्रे भारतभर विविध औद्योगिक युनिटमध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रत्येक औद्योगिक युनिट आपल्या नायट्रोजन यंत्राचे ऑक्सिजन निर्मिती करणार्‍या यंत्रात रूपांतर करू शकेल. त्यामुळे औद्योगिक युनिटमधील प्रत्येक नायट्रोजन यंत्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्मिती केली जाऊ शकते, असे या प्रकल्पाचे नेतृत्व करणारे आयआयटी मुंबईच्या संशोधन आणि विकास विभागाचे अधिष्ठाता प्रा. मिलिंद अत्रे यांनी सांगितले.

  सध्याच्या सार्वजनिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत हे प्रकल्प उपयोगी ठरू शकतात, असेही अत्रे यांनी सांगितले.

  ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रमाणित करण्याच्या दृष्टीने, आयआयटीच्या रेफ्रिजरेशन अ‍ॅन्ड क्रायोजेनिक्स प्रयोगशाळेत पीएसए नायट्रोजन संयंत्राचे ऑक्सिजन संयंत्रात रूपांतर केले. हा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि पीएसए नायट्रोजन आणि ऑक्सिजन संयंत्र उत्पादक असलेले स्पॅन्टेक इंजिनियर्स मुंबई यांचा संयुक्त प्रयत्न आहे.

  आयआयटी मुंबई आणि स्पॅन्टेक इंजिनियर्स यांच्याशी भागीदारी केल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. सध्याच्या ऑक्सिजन संकटात देशाला मदत करण्याच्या दृष्टीने अस्तित्त्वात असलेल्या पायाभूत सुविधांचा वापर करून आपत्कालीन ऑक्सिजन निर्मितीसाठी एक अभिनव उपाय शोधायला हातभार लावत आहोत. उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील अशा प्रकारच्या भागीदारीमुळे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपली वेगाने वाटचाल होऊ शकते.

  - अमित शर्मा, व्यवस्थापकीय संचालक, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स

  या पथदर्शी प्रयोगाचा देशभरात फायदा होऊ शकेल अशा प्रमाणित कार्यपद्धतीला अंतिम स्वरूप देण्यासाठी आवश्यक तसेच तो देशभरातील विविध औद्योगिक युनिटमध्ये तातडीने लागू करण्यासाठी लागणारा अभ्यास करण्यासाठी, आयआयटी मुंबई, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्स आणि स्पॅन्टेक इंजिनिअर्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.

  या प्रकल्पातील सहयोग आणि भागीदारीबद्दल, टाटा कन्सल्टिंग इंजिनिअर्सचे व्यवस्थापकीय संचालक अमित शर्मा यांच्यासह स्पॅन्टेक इंजिनियर्सचे प्रवर्तक आणि आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी राजेंद्र तहिलियानी, स्पॅन्टेक इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक राज मोहन आणि अन्य सदस्य अभिनंदन करत आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. सुभासिस चौधरी यांनी शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील अशाप्रकारची भागीदारी आपल्या देशाच्या वाढीसाठी आणि यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले.