आयआयटीच्या संशोधकांनी तयार केले रिमोटवर चालणारे सॅनिटायझर यंत्र

मुंबई :आयआयटी मुंबईतील संशोधकांनी एकाचवेळी जास्तीत जास्त भाग निर्जंतूक करता येणारे रिमोटवर चालणारे एक उपकरण विकसित केले आहे.घरात असलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांना रसायनांची बाधा होऊ

 मुंबई : आयआयटी मुंबईतील संशोधकांनी एकाचवेळी जास्तीत जास्त भाग निर्जंतूक करता येणारे रिमोटवर चालणारे एक उपकरण विकसित केले आहे.घरात असलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांना रसायनांची बाधा होऊ नये, यासाठी द्रवरूप वापरण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले आहे. आयआयटी मुंबईच्या जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक अंबरिश कुंवर आणि प्राध्यापक किरण कोंडाबगील यांनी हे उपकरण विकसित केले आहे. याचे प्रोटोटाइप आयआयटी मुंबईच्या संकुलातील रुग्णालयात वापरात आणले आहे. रुग्णालयाने याचा वापर रिकाम्या खोल्यांमध्ये केला आहे. अनेकदा एखादा परिसर निर्जंतूक करण्यासाठी अनेकदा माणसांना त्या परिसरात जावे लागते मात्र त्यात अनेक धोके असू शकतात. हे धोके कमी व्हावे या उद्देशाने रिमोटवर चालणारे हे उपकरण विकसित करण्यात आले आहे. यामुळे एका खोलीत बसून एखादी व्यक्ती हे उपकरण रिमोट कंट्रोलद्वारे वापरू शकते. यामुळे ते उपकरण वापरून पाहिजे त्या कोपऱ्यात जाऊन सॅनिटायझेशन करता येऊ शकणार आहे. या सॅनिटायझरच्या उपकरणाचे रोबोमध्ये रुपांतर करण्यासाठी आयआयटीमधील इंडस्ट्रिअल डिझाईन सेंटरमधील प्राध्यापक काम करणार असल्याचेही प्रा. कुंवर यांनी सांगितले. 

लॉकडाऊन उठल्यावर जेव्हा सर्व वाहतूक यंत्रणा, शाळा, कॉलेजे, शॉपिंग मॉल्स सुरू होतील तेव्हा ते सॅनिटाईझ करावे लागतील. ते वारंवार सॅनिटाईझ करावे लागणार आहेत. अशावेळी या उपकरणाचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ शकतो, असा विश्वासही  व्यक्त करण्यात आला आहे.