लॉकडाऊनमध्ये मुंबईत अवैध बांधकामे जोरात; वर्षभरात १३ हजारांहून अधिक तक्रारी

लॉकडाउन कालावधीत (lockdown period) आणि लॉकडाउनमधील निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामांना (Illegal constructions) पेव फुटले आहेत. अवैध बांधकामांच्या मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत तब्बल १३ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत.

    मुंबई (Mumbai). लॉकडाउन कालावधीत (lockdown period) आणि लॉकडाउनमधील निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबईत अवैध बांधकामांना (Illegal constructions) पेव फुटले आहेत. अवैध बांधकामांच्या मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत तब्बल १३ हजारांहून अधिक तक्रारी आल्या आहेत. त्यात ३,७६७ तक्रारी दुबार आहेत. वर्षभराच्या कालावधीत एकूण साडेनऊ हजार अवैध बांधकामांची नोंद झाली आहे. त्यापैकी फक्त ४६६ बांधकामे पाडली आहेत. यामध्ये मालाड (Malad) पी-उत्तर विभागात (P North section) ४२९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील ३४२ अनधिकृत बांधकामे असून ६२ प्रकरणात कारवाई झाली आहे.

    कोरोना काळात मुंबईत किती अवैध बांधकामांच्या तक्रारी आल्या, कितींवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला, याची माहितीचा अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मिळालेल्या माहितीतून समोर आली आहे. त्यांना पालिकेने दिलेल्या लेखी उत्तरात ऑनलाइन प्रणालीवरील २५ मार्च २०२० पासून २८ फेबुवारी २०२१ पर्यंतची माहिती देण्यात आली आहे. मागील वर्षीपासून कोरोना विरोधात पालिकेचा लढा सुरु आहे. त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात कोरोना उपाययोजनांच्या कामांत पालिकेची यंत्रणा व्यस्त आहे. त्याचा फायदा उठवत भूमाफिया, झोपडीदादांनी मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे केली आहेत. पालिकेच्या सभागृहात यावर नगरसेवकांनी आवाजही उठवला.

    पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून अवैध बांधकामांच्या सर्वाधिक म्हणजे सुमारे १२०० ते ३२५० तक्रारी आल्या आहेत. कुर्ला परिसरात साकीनाका येथील खैरानी रोड भागात सर्वांत जास्त अवैध बांधकामे आहेत. फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे. या भागात गेल्या दोन वर्षांत मुंबईतील सर्वाधिक आगी लागल्या आहेत. काळबादेवी, चंदनवाडी, भुलेश्वर परिसराचा समावेश असलेल्या सी विभागातून ६१४ तक्रारी आल्या असून फक्त २४ प्रकरणी कारवाई झाली आहे.