कोरोना नियमांचे पालन करून दीड दिवसांच्या ६,१०२ गणेशमूर्तींचे मुंबईत विसर्जन; कृत्रिम तलावांत सर्वाधिक ३,५८९ मूर्तींचे विसर्जन

गणेश भक्तांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणीच गणेशाची भावपूर्ण आरती केली व ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत, नैसर्गिक व कृत्रिम तलावांत मिळून एकूण ६ हजार १०२ गणेश मूर्तींचे व १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले आहे.

  मुंबई (Mumbai) : गेल्या वर्षीप्रमाणेच मुंबईत कोरोनाच्या निर्बंधाच्या छायेत मुंबईकरांनी कोरोना नियमांचे पालन करीत दीड दिवसांच्या श्री गणेशांचे (Lord Ganesha) शनिवारी सायंकाळी दीड दिवसांच्या ६ हजार १०२ मूर्तींचे आणि १४ हरतालिकांचे विसर्जन (immerse) केले. या ६ हजार १०२ गणेश मूर्तींमध्ये ६ हजार ४७ घरगुती गणेशमूर्तींचा तर ५५ सार्वजनिक गणेशमूर्तींचा (public Ganesha idols) समावेश आहे.

  ६८ नैसर्गिक तर १७० पेक्षाही जास्त कृत्रिम तलाव उपलब्ध
  या वर्षी देखील कोरोनाच्या निर्बंधासह पर्यावरणाच्या नियमांचे पालन करत भाविकांनी नैसर्गिक विसर्जन स्थळांपेक्षाही कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला चांगला प्रतिसाद दिला. एकूण ६ हजार १०२ गणेशमुर्तींमध्ये, कृत्रिम तलावांत ३ हजार ५८९ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे.

  मुंबई महापालिकेने यंदाही ६८ नैसर्गिक विसर्जन स्थळी व १७० पेक्षाही जास्त कृत्रिम तलाव तसेच फिरत्या कृत्रिम तलावांच्या ठिकाणी गणेश मूर्तींच्या विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली होती. सार्वजनिक व कृत्रिम विसर्जन स्थळी पालिका व खासगी कर्मचारी यांची गणेशमूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.तसेच, समुद्र चौपाट्यांच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडू नये, यासाठी जीवरक्षक, पोलीस यांचीसुद्धा व्यवस्था करण्यात आली होती.

  कोरोनामुळे गणेश मंडळांचाही दीड दिवसांचा गणेशोत्सव
  यंदाचे वैशिष्ट्य म्हणजे, कोरोनाचे सावट असल्याने अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी व गणेश भक्तांनी साधेपणाने दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला. विसर्जन मिरवणूक काढण्यास बंदी असल्याने गणेश भक्तांनी घरात, कार्यालयात व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणीच गणेशाची भावपूर्ण आरती केली व ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करीत दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत, नैसर्गिक व कृत्रिम तलावांत मिळून एकूण ६ हजार १०२ गणेश मूर्तींचे व १४ हरतालिकांचे विसर्जन करण्यात आले आहे. या ६,१०२ गणेशमूर्तींमध्ये ५५ सार्वजनिक तर ६,०४७ घरगुती मूर्तींचा समावेश आहे.