कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा देणे अशक्य;  परीक्षा पुढे ढकलण्याची मार्ड ची मागणी

मुंबई: मुंबईकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केल्याने एप्रिलमध्ये होणारी वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा १५ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला होता. मात्र सध्या राज्यातील कोरोनाची वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांच्या सेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना १५ जूनला परीक्षा देणे शक्य नाही.

 मुंबई: मुंबईकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केल्याने एप्रिलमध्ये होणारी वैद्यकीय अभ्यासक्रमाची परीक्षा १५ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला होता. मात्र सध्या राज्यातील कोरोनाची वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णांच्या सेवेत असलेल्या निवासी डॉक्टरांना १५ जूनला परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी केईएम हॉस्पिटलच्या मार्ड संघटनेकडून करण्यात आली आहे.

 
राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात सापडू लागल्याने सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केले. लॉकडाऊनमुळे सर्वच विद्यापीठाने आपापल्या परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदव्यूत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एप्रिलमध्ये असणारी परीक्षा १५ जूनपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
 यामध्ये एमडी, एमएस, डिप्लोमा आणि एमएससी कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परंतु सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ही परिस्थिती आणखी ३  ते ४ महिने आटोक्यात येणे शक्य नाही. अंतिम वर्षाला असणारे विद्यार्थी तीन वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या काळात घरी न जाता, परिवारास वेळ न देता, किरकोळ आजाराच्या वेळेस रजा न घेता, केवळ अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी राखून ठेवलेल्या ६० ते ७० दिवसाच्या सुट्या सोडून कोरोना ड्युटी करत आहेत. वाढत जाणारी कोरोना रुग्ण संख्या आणि विद्यापीठाकडून घेण्यात येणारी परीक्षा यामुळे सध्या निवासी डॉक्टर हैराण झाले आहेत. त्यामुळे तीन महिन्यात कोरोना संकट टळले तरी परीक्षेच्या अभ्यासासाठी डॉक्टरांना वेळ देणे आवश्यक आहे. त्यामुळे १५ जूनला होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या मार्डच्या केईएम हॉस्पिटलच्या संघटनेकडून करण्यात आली आहे.