भिवंडीत नालेसफाईच्या कामाच्या पाहणीसाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरली…

नालेसफाई सुरू असताना बऱ्याचदा अधिकारी, लोकप्रतिनिधी नाल्याच्या कडेला उभे राहून कामाची पाहणी करताना आपण नेहमीच पाहतो. पण भिवंडीत नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्या. त्यांच्या या कामाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

    भिवंडी : पावसाळ्याच्या तोंडावर ठिकठिकाणी नालेसफाईच्या कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींकडून नालेसफाईची पाहणी केली जात आहे. नालेसफाई सुरू असताना बऱ्याचदा अधिकारी, लोकप्रतिनिधी नाल्याच्या कडेला उभे राहून कामाची पाहणी करताना आपण नेहमीच पाहतो. पण भिवंडीत नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी महिला आरोग्य निरीक्षक थेट मॅनहोलमध्ये उतरल्या. त्यांच्या या कामाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

    भिवंडीत प्रभाग समिती क्रमांक दोन अंतर्गत शांतीनगर, आझाद नगर, चावींद्रा, अवचित पाडा, खंडू पाडा या भागातील पाणी वाहून नेण्यासाठी भलामोठा नाला या ठिकाणाहून आरिफ गार्डन इथून पुढे जातो. इथल्या रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी स्थानिक वार्ड क्रमांक दोनच्या आरोग्य निरीक्षक सुविधा सुभाष चव्हाण यांच्यावर आहे. नाल्याच्या सफाई कामावर प्रत्यक्ष हजर राहून देखरेख करत असताना नक्की काम किती झाले हे पाहण्यासाठी सुविधा चव्हाण या थेट मॅनहोलमधून भल्यामोठ्या नाल्यात उतरल्या.

    दरम्यान किती काम झालं?, नक्की काय काम झालं? हे पाहण्यासाठी एक महिला अधिकारी आपला पदर खोचून नाल्यात उतरली याचं सर्वचं स्तरातून कौतुक केलं जात आहे. “आयुक्तांनी नुकतीच माझी नियुक्ती प्रभारी आरोग्य निरीक्षक पदावर केली आहे. आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, पण ते आपलं कर्तव्य आहे या भावनेतून मी काम केलं. त्यासाठीच मी नाल्यात उतरली”, अशी प्रतिक्रिया सुविधा चव्हाण यांनी दिली.