कोरोनाच्या काळात शिक्षक करत आहेत घरोघरी किराणा पोहचविण्याचे काम

मुंबई : लॉकड़ाऊनच्या काळात शिक्षक चक्क डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत, राज्य सरकारने शिक्षकांवर विविध कामे सोपवली आहेत, त्यात दारूच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी सोपविण्यात

मुंबई  : लॉकड़ाऊनच्या काळात शिक्षक चक्क डिलिव्हरी बॉयचे काम करत आहेत, राज्य सरकारने शिक्षकांवर विविध कामे सोपवली आहेत, त्यात दारूच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आल्याने शिक्षकांच्या प्रतिमेला धक्का लावणाऱ्या या कामांना जुंपल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा तसेच संतापाचा सूर उमटत आहे.  

कोरोना लढ्यातील महत्त्वाची कामे असलेली कोरोना सर्वेक्षण, क्वारंटाईन सेंटरवरील जबाबदारी शिक्षकांनी आनंदाने स्वीकारत कामाला सुरुवातही केली. परंतु सध्या शाळा बंद असल्याने व त्यांना काही कामे नसल्याने सरकारने शिक्षकांना चेकपोस्टवरही ड्युट्या लावल्या. परंतु आता सरकारने कहरच केला आहे. चांगला समाज घडवण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकांवर दारूच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर त्यांना डिलिव्हरी बॉयचे काम लावले आहे. शिक्षकांना घरपोच किराणा पोहचविण्याचे फर्मान काही तहसीलदारांनी काढले आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर काय राहील, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

राज्यातील अनेक तहसीलदारांनी त्यांच्या हद्दीतील लोकांना घरपोच किराणा देण्यासाठी शिक्षकांचे मोबाईल क्रमांक दिले आहेत. या मोबाईल क्रमांकावर लोकांनी संपर्क साधून शिक्षकांना किराणा सामानाची यादी द्यायची आहे. शिक्षकांनी किराणा दुकानात जाऊन खरेदी करून तो माल घरपोच द्यायचा आहे. 

कोरोनाचा नावाखाली अधिकाऱ्यांना वाट्टेल तशी कामे शिक्षकांच्या माथी मारली जात आहे. कोणतीही सुविधा न देता कोरोना सर्वेक्षण करणे, चेकपोस्ट वर गाड्यांची तपासणी करणे, दारूच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रित करणे अशी कामे देण्यात आली असून राज्यात शिक्षकांच्या अशैक्षणिक कामांमुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे याबाबत तक्रारी करून सुद्धा शिक्षकांच्या प्रश्नांकडे कानाडोळा केला जात असून राज्यात शिक्षकांना कुणी वालीच उरला नसून शिक्षणमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी आता शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे. 

“दारूच्या दुकानांवरील गर्दी नियंत्रणासाठी नियुक्ती, चेकपोस्ट वर उन्हातान्हात गाड्यांची तपासणी करणे अशी कामे देऊन राज्यात शिक्षकांच्या ड्युटी लावल्या जात आहेत. आता तर किराणा दुकानातील माल घरी पोहचविण्यासाठी डिलिव्हरी बॉयची नियुक्ती एका ठिकाणी लावल्या गेल्याने शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिक्षणमंत्र्यांनी यामध्ये ताबोडतोब हस्तक्षेप करून शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावी.”

– अनिल बोरनारे, संयोजक, भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण विभाग