धारावीत महिनाभरात तीनवेळा रुग्णांची संख्या शून्यावर ; २४ तासांत एकही रुग्ण आढळला नाही

मुंबईत गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ही झाेपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश आले. विस्तारलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलचे जगभरात कौतुकही झाले. पहिल्या लाटेत धारावीत सहावेळा रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यावेळी धारावीतही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला.

    मुंबई : आशिया खंडातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीत कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेला यश आले आहे. गेल्या महिनाभरात येथे तीनवेळा येथे एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने चाललेली वाटचाल धारावीकरांना दिलासा देणारी आहे.

    मुंबईत गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ही झाेपडपट्टी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. मात्र पालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी पालिकेला यश आले. विस्तारलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत राबवण्यात आलेल्या धारावी मॉडेलचे जगभरात कौतुकही झाले. पहिल्या लाटेत धारावीत सहावेळा रुग्णांची संख्या शून्यावर आली. त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यानंतर कोरोनाच्या दुस-या लाटेत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. यावेळी धारावीतही कोरोनाने पुन्हा शिरकाव केला.

    रोज रुग्णांची संख्या ७० ते ८० वर पोहचली. मात्र पालिकेने येथे पुन्हा यंत्रणा कामाला लावली. घरोघरी सर्वेक्षण, चाचण्यांची संख्या वाढवली. आरोग्य शिबिरे, कंटेनमेंट झोन, क्वारंटाईनचे नियमांची अमलबजावणी, जनजागृती, उपचार पद्धती आदी उपाययोजनांमुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली. जूनमध्ये महिनाभरात तीन वेळा रुग्णांची संख्या शून्य नोंद झाली आहे. यात १४ जून व १५ जून या सलग दोन्ही दिवशी एकही रुग्ण सापडला नाही. त्यानंतर बुधवारी धारावीत एकही रुग्ण आढळला नसल्याची नोंद झाली आहे.

    सक्रीय रुग्णांची संख्याही घटली

    धारावीत मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या दोन आकड्यावरून एक अंकावर आली आहे. मागील २४ तासांत येथे एकही रुग्ण आढळलेला नाही. येथील सक्रीय रुग्णांची संख्य़ाही घटली आहे. सध्या फक्त १० सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.