मुंबई पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सीबीएसई शाळा सुरू होणार, शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली माहिती

येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक वॉर्डात एक सीबीएसई बोर्डाची शाळा(CBSE Board School) सुरू करण्यात येणार असल्याचे पालिकेचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी राजू तडवी(Raju Tadvi) यांनी सांगितले आहे.

    मुंबई : पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू (CBSE Schools To Be Open In Mumbai)करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून(Educational Year) राबवला जाणार आहे. यामुळे पालिका शाळांकडे विद्यार्थी-पालकांचा ओढा वाढणार आहे. पालिकेचे नवनियुक्त शिक्षणाधिकारी राजू तडवी(Raju Tadvi) यांनी ही माहिती दिली.

    मुंबई पालिकेच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फी न घेता मोफत शिक्षण दिले जात आहे. गणवेश,बूट, वह्या-पुस्तके अशा २७ मोफत वस्तूंसह बेस्टमधून मोफत प्रवासाचीही सुविधा आहे. विशेष म्हणजे सध्या सीबीएसई केंद्रीय बोर्डाच्या १० आणि दोन आयसीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. तर येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्येक वॉर्डात एक सीबीएसई बोर्डाची शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिका शाळांमध्ये अद्ययावत आणि डिजिटल शिक्षणासह कला, क्रीडा, संगीत अशा सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. अनेक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर यशस्वी होऊन पालिकेचेही नाव उज्ज्वल करीत आहेत. आगामी काळात २४ संगीत अकादमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार संगीत शिक्षण दिले जाईल.लवकरच याची अंमलबजावणी होईल.

    पालिकेचे विद्यार्थी हस्तकला, राख्या बनवणे अशा कामांत पारंगत असून त्यांच्या वस्तूंना मोठी मागणीही आहे. मान्यता नसलेल्या २०६ शाळांमध्ये सुमारे ४७ हजार विद्यार्थी आहेत. मात्र संबंधित शाळांना मान्यताच नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या शाळांच्या व्यवस्थापनांना वेळोवेळी नोटीस बजावून राज्य सरकारकडून मान्यता घेण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. याबाबत पालिका प्रशासनाकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. शिवाय मान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये यासाठी प्रसारमाध्यमातून अनेक वेळा माहितीही प्रसिद्ध करण्यात येत आहे, असे तडवी यांनी सांगितले.