मुंबईमध्ये कोरोनाचे १६७ रुग्ण बरे ;२८१ नवे रुग्ण तर बाधितांची संख्या ४८७० वर

कोरोनाबाधित १२ रुग्णांचा मृत्यू मुंबई :दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.शुक्रवारी १२२ जणांना घरी सोडले असताना शनिवारी तब्बल १६७

कोरोनाबाधित १२ रुग्णांचा मृत्यू

मुंबई :दोन दिवसांपासून मुंबईतील रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचे  चित्र दिसून येत आहे.शुक्रवारी  १२२ जणांना घरी सोडले असताना शनिवारी तब्बल १६७ जणांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ मुंबईसाठी दिलासा दायक ठरली आहे. मुंबईमध्ये शनिवारी तब्बल २८१ रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांचा आकडा ४८७० वर पोहचला असून १२ जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९१ झाली आहे. 

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत शनिवारी काही अंशी घट झाली आहे. आठवडाभरापासून सातत्याने ३०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत असताना शनिवारी मुंबईमध्ये २८१ नवे रुग्ण सापडले. 

यामध्ये २२ एप्रिलदरम्यान विविध प्रयोगशाळांमध्ये झालेल्या कोविड १९ चाचणीचा अहवालात पॉझिटिव्ह आलेल्या ७८ जणांचा समावेश आहे. मात्र सलग दुसऱ्या दिवशी तब्बल १०० पेक्षा अधिक रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण सापडण्याच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या फारच कमी असताना शनिवारी तब्बल १६७ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. त्यामुळे घरी सोडलेल्या रुग्णांचा आकडा ७६२ इतका झाला आहे. 

तसेच मुंबईमध्ये १२जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या १९१ वर पोचली आहे. १२ मृत झालेल्या व्यक्तींपैकी ६ जण हे दीर्घकाळ आजारी होते. मृतांमध्ये ९ जण पुरुष तर ३ जण महिला होत्या. यामध्ये ४० वर्षांखालील एक आणि ४० ते ७० वर्षादरम्यानचे १० जण होते. 

त्याचप्रमाणे कोरोनाचे ३५७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ७९६३ वर पोहचली असल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.