मुंबईत प्रेमी युगुलाने वयोवृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यानी उलगडलं हत्येचं गूढ, काय आहे प्रकरण ? : वाचा सविस्तर

मुंबईतील भांडूप परिसरात चाळीमध्ये एकट्या राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नेमकी कोणी केली? याबाबत भांडूप पोलीस गेल्या दीड महिन्यांपासून आरोपींच्या शोधात होते. पण त्यांना आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. पण मुंबई पोलिसांनी नुकतंच हत्येचं गूढ उलगडल आहे.

    मुंबई : दीड महिन्यापूर्वी मुंबईतील भांडूप परिसरात चाळीमध्ये एकट्या राहणाऱ्या 70 वर्षीय वृद्ध महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नेमकी कोणी केली? याबाबत भांडूप पोलीस गेल्या दीड महिन्यांपासून आरोपींच्या शोधात होते. पण त्यांना आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. पण मुंबई पोलिसांनी नुकतंच हत्येचं गूढ उलगडल आहे.

    दरम्यान या प्रकरणात उत्तर प्रदेशातून एका प्रेमी युगुलाला अटक केली आहे. महिलेची हत्या झाल्यापासून हे प्रेमी युगुल भांडूप परिसरातून गायब होतं. या घटनेचा पुढील तपास भांडूप पोलीस करत आहेत. संबंधित 70 वर्षीय मृत महिलेचं नाव रत्नाबेन मोहनलाल जैन असून त्या भांडूप पश्चिममधील फुगावाला कंपाऊंट परिसरात एका चाळीतील घरात राहत होत्या. 14 एप्रिल रोजी त्यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरकाम करण्यासाठी आलेल्या महिलेनं घरात प्रवेश केला असता, रत्नाबेन यांचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांना आढळलं. यानंतर संबंधित घरकाम करणाऱ्या महिलेनं याची माहिती शेजारी राहणाऱ्या लोकांना आणि भांडूप पोलिसांना दिली.

    70 वर्षी मृत महिला रत्नाबेन मोहनलाल जैन या सावकारीचा व्यवसाय करत होत्या. त्यामुळे ही हत्या पैशाच्या अथवा चोरीच्या उद्देशाने झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. याच दिशेने त्यांनी तपास केला असता, या हत्येचे धागेदोरे उत्तर प्रदेशातील एका प्रेमी युगुलापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. ही हत्या नियोजित कटाचा भाग असल्याची माहिती भांडूप पोलिसांनी दिली आहे.