मुंबई-नवी मुंबईतील शाळांचा ‘फी’ भरण्यासाठी पालकांकडे तगादा, आठ शाळांची होणार NOC रद्द

मुंबई-नवी मुंबईतील सात शाळांना फी वाढ करणे आणि विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे महागात पडले आहे. पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावणे, विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे यासह शिक्षण अधिकार अधिनियमांचे उल्लंघन केल्यामुळे ८  शाळांवर अखेर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

  मुंबई : कोरोना विषाणूमुळे सामान्य लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे शाळा आणि त्यांची शुल्कवाढ. कोरोनामुळे राज्यातील अनेक शाळा सध्या बंद आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू आहे. परंतु कोरोना काळात कोणत्याही प्रकारची शुल्कवाढ करू नये, असे स्पष्ट आदेश असताना देखील मुंबई-नवी मुंबईतील सात शाळांना फी वाढ करणे आणि विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे महागात पडले आहे.

  पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावणे, विद्यार्थ्यांचे निकाल रोखणे यासह शिक्षण अधिकार अधिनियमांचे उल्लंघन केल्यामुळे ८  शाळांवर अखेर शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या शाळांचे ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण संचालकांकडे सादर करण्यात आला असून लवकरच याबाबत अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे.

  शिक्षण विभागाच्या या प्रस्तावामुळे राज्यभरातील खासगी शिक्षणसंस्थाचालकांचे धाबे दणाणले आहे. मुंबईसह नवी मुंबईतील अनेक शाळांनी कोरोनाच्या काळात सर्रासपणे फी वाढीचा निर्णय घेऊन पालकांची लूट सुरू केली होती. इतकेच नव्हे तर पालकांकडे फी भरण्यास तगादा लावत पालकांच्या नाकीनऊ आणले होते. यासंदर्भात अनेक विद्यार्थी आणि पालक संघटनांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे देखील धाव घेतली होती. तर काही पालकांनी याबाबत शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत मुंबई विभागातील नवी मुंबई भागातील एकूण सहा शाळांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

  या आहेत मुंबई आणि नवी मुंबईतील आठ शाळा

  • अमृता विद्यालय, नेरुळ
  • न्यू हॉरायझन पब्लिक स्कूल, नेरुळ
  • रायन इंटरनॅशनल स्कूल, सानपाडा
  • सेंट लॉरेन्स स्कूल, वाशी
  • तेरणा ऑर्चिड इंटरनॅशनल, कोपरखैराणे
  • विश्वज्योत हायस्कूल, खारघर
  • बिल्लाबाग इंटरनॅशनल स्कूल, मालाड
  • बिल्लाबाग इंटरनॅशनल स्कूल, सांताक्रूझ

  शाळांवर ठेवलेला ठपका

  • लॉकडाऊन कालावधीत फी वाढ करणे
  • पालकांकडे फी भरण्यास तगादा लावणे
  • फी न भरल्यामुळे निकालपत्र रोखून ठेवणे
  • विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात बढती न देणे
  • फी न भरल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून कमी करणे