मुंबईकर ऐकेनात, अखेर महापौर किशोरी पेडणेकरांनी हात जोडले, काय म्हणाल्या : वाचा सविस्तर

    मुंबई : कोरोनामुळे निर्माण झालेला हाहाकार पाहता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना थेट हात जोडले आहेत. घरातून बाहेर पडू नका. डबल मास्क वापरा, असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना हात जोडून केलं आहे. तसेच मुंबई महापालिकेनेही ट्विटर हँडलवरून मुंबईकरांना डबल मास्क वापरण्याचं आवाहन केलं आहे. आधी चेहऱ्यावर सुती कपड्याचं मास्क लावा. त्यानंतर सर्जिकल मास्क लावा, असं आवाहन पालिकेने केलं आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना घराबाहेर विनाकारण न पडण्याचं आवाहन केलं आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा. घराबाहेर पडताना डबल मास्क लावा. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करा, असं आवाहन महापौरांनी केलं आहे.

    नेटिजन्सचे पालिकेला सवाल

    पालिकेने ‘mybmc’ या ट्विटर हँडलवरून हे आवाहन केलं आहे. N-95 मास्क किंवा सर्जिकल मास्कमुळे 95 टक्के सुरक्षा मिळते. तर सुती कापडाच्या मास्कमुळे शून्य टक्के सुरक्षा मिळते, असा दावा पालिकेने केला आहे. पालिकेच्या या दाव्यावर नेटीजन्सनी सवाल केले आहेत. पालिकेने हा दावा केला आहे, त्याला आधार काय आहे? असा सवाल नेटिजन्सनी केला आहे. महापालिका N-95 मास्कची जाहिरात करत आहे का? असा सवालही लोकांनी केला आहे. एक मास्क लावल्याने गुदमरल्या सारखं होतं. डबल मास्क लावल्याने अधिक त्रास होणार नाही का?, असा सवाल नागरिकांकडून होत आहे. त्यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सुती कापडाचे मास्कही सुरक्षित असते. मात्र लोक लोक हा मास्क चेहऱ्यावरून काढतात. त्याचा योग्य उपयोग होत नाही. त्यामुळे डबल मास्क लावायला हवा, असं काकानी यांनी म्हटलं आहे.

    डबल मास्क कसा असावा?

    तुम्ही वापरत असलेला डबल मास्क तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित आहे की नाही याची काळजी घ्या. जर तो योग्यरित्या बसत नसेल तर तो कोरोनाचे विषाणू सहज तुमच्या शरीरात शिरकाव करु शकतात, त्यामुळे ते धोकादायक ठरते. दोन मास्क घातल्याने तुमचा कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव होऊ शकतो. दरम्यान अमेरिकेतील रोग आणि नियंत्रण प्रतिबंधक केंद्र (सीडीसी) यांच्या अभ्यासानुसार, दोन मास्क घालणं हे फार प्रभावी मानले जाते. पण दोन मास्क व्यवस्थितरित्या लावल्यास तुम्ही कोरोनापासून स्वत:चा बचाव करु शकता.