प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC)मुंबईतील १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन निर्मित प्रकल्प (ऑक्सिजन प्लांट)(Oxygen Plant) राबवण्याचे काम हाती घेतले आहे.

    मुंबईः मुंबई महापालिका प्रशासनाने (BMC)मुंबईतील १२ रुग्णालयांमध्ये १६ ऑक्सिजन निर्मित प्रकल्प (ऑक्सिजन प्लांट)(Oxygen Plant) राबवण्याचे काम हाती घेतले आहे. या प्लांटच्या कामाला सुरुवात झाली आहे. हे सर्व प्रकल्प या येत्या काही दिवसांत कार्यान्वित होतील, असा विश्वास विद्युत व यांत्रिक विभागाने व्यक्त केला आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने रुग्णालयातील खाटा, ऑक्सिजन, वेंटिलेटरची कमतरता भासू लागली. रुग्णवाढीमुळे आरोग्य विभागावरही ताण आला. ऑक्सिजन नसल्याने काही ठिकाणी रुग्णांना इतर ठिकाणी हलवावे लागले होते. हे लक्षात घेऊन आगामी काळात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी महापालिका प्रशासनाने ऑक्सिजन उपलब्‍धतेबाबत कायमस्‍वरुपी उपाययोजना म्‍हणून एकूण १२ रुग्‍णालयांमध्‍ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्‍प उभारण्‍याचे निश्चित केले आहे. यामध्‍ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्‍णांना पुरवण्‍यासाठी या प्लांटची निर्मिती केली जात आहे.

    या प्रकल्पांमधून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार आहे. १६ प्रकल्‍पांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये हायवे कंस्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली होती. या कंपनीला सुमारे ९० कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले. मागील महिन्यात याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर कामाला सुरुवात झाली आहे.

    ६० ते ७० टक्के काम पूर्ण

    रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांटचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे ८ ते १० दिवसांत पूर्ण होऊन सर्व प्लांट कार्यान्वित होतील, असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. यातील नायरसह अन्य प्लांटची कामे जवळपास पूर्ण होत आली आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.