नालासोपाऱ्यात १० वर्ष जुनी इमारत पत्यासारखी कोसळली

नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. सन २००९ साली ही अनधिकृत इमारत बांधली गेली होती. या इमारतीमध्ये एकूण २० रूम होते. दरम्यान इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बिल्डींग खाली करण्याची नोटीस बजावली होती.

वसई: नालासोपारा पूर्वेत मध्यरात्री दीडच्या सुमारास साफल्य नावाची ४ मजली इमारत पत्यासारखी कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या इमारतीत जवळपास २० कुटुंब राहत होते. तसेच ही इमारत १० वर्ष जुनी आहे. इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच सर्व रहिवाशी तात्काळ बाहेर निघाल्याने सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. परंतु नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत आहे. सन २००९ साली ही अनधिकृत इमारत बांधली गेली होती. या इमारतीमध्ये एकूण २० रूम होते. दरम्यान इमारत धोकादायक झाल्याने राहिवाशांना महापालिकेने बिल्डींग खाली करण्याची नोटीस बजावली होती. काल मंगळवारी रात्रीच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे त्या आवाजाने इमारतीमधील रहिवासी जागे झाले आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली आणि काही वेळेतच मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास सर्वांच्या डोळ्यासमोर ४ मजली इमारत पत्यासारखी कोसळली. इमारतींमधील रहिवाशी बाहेर आल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, महाड शहरातील काजळपूरा खारखांड मोहल्ला येथील एक दोन विंगची पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळली होती. यामध्ये जवळपास ४० ते ५० कुटूंबीय २०० ते २५० रहिवासी या इमारतीमध्ये राहत होते. महाडमधील तारिक गार्डन ही ५ मजली इमारत कोसळून झालेली दुर्घटना धक्कादायक आहे. त्यानंतर या घटनेला १० दिवसही पूर्ण झाले नसताना मुंबईमध्ये नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर येथे साफल्य नावाची इमारत अचानक कोसळली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.