विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव

मुंबई - 'बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९' मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी

 मुंबई – ‘बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९’ मधील कलम १२(१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला / मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. दरवर्षी प्रमाणे सन २०२० – २१ या वर्षासाठीही ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले हाते. यानुसार महापालिकेकडे एकूण १४ हजार १३५ अर्ज प्राप्त झाले. प्राप्त झालेल्या अर्जांची लॉटरी दि. १७.०३.२०२० रोजी काढण्यात आली आहे. यामध्ये एकूण ५ हजार ३७१ विद्यार्थी लॉटरी पद्धतीने निवडण्यात आले. तर ३ हजार ४२१ विद्यार्थी प्रतिक्षा यादीत आहेत. या निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये ४ हजार ५३ विद्यार्थी हे एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांकरिता; तर इतर १ हजार ३१८ विद्यार्थी अन्य बोर्डचे आहेत. सदर लॉटरीद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ‘मॅसेज’ पाठविण्यात आले आहेत. मात्र, लॉकडाऊन असल्या कारणाने प्रवेश प्रक्रियेचे पुढील कामकाज होऊ शकले नाही. शैक्षणिक वर्ष सन २०२० – २०२१ हे दि. १५.०६.२०२० पासून सुरु झालेले आहे. सद्यस्थितीत पडताळणी केंद्रावर पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणे अडचणीचे आहे. त्यामुळे फक्त या शैक्षणिक वर्षासाठी शाळा स्तरावर कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी करुन व संकलन करुन पडताळणी समितीच्या मान्यतेने प्रवेश द्यावयाचे आहेत. त्यानुसार कागदपत्रांची प्राथामिक पडताळणी करण्याविषयी टप्पेनिहाय माहिती पुढीलप्रमाणेः

१. शाळेने करावयाची कार्यवाही

.शाळेला आरटीई पोर्टलवर स्कूल लॉगीनला त्यांच्या विद्यार्थ्यांची नावे व मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावावयाचे आहे, ती तारीख शाळेने टाकावी; त्याप्रमाणे पालकांना लघुसंदेश (एस.एम.एस) जातील. विद्यार्थ्यांच्या पालकांना कोणत्या तारखे0ला बोलवावे हे शाळेने ठरवावे. गर्दी होणार नाही अशा प्रकारे शाळेने नियोजन करावे.

प्रवेशाचे वेळापत्रक शाळेच्या गेटवर अथवा योग्य त्या ठिकाणी लावण्यात यावे.

शाळेत आल्यानंतर पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकीत प्रत प्राप्त करुन घ्यावी. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी करुन योग्य असल्यास विद्यार्थ्याच्या नावापुढे तशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करावी. तसेच पालकाकडील ‘अलॉट्मेंट लेटरवर तात्पुरता प्रवेश दिला’ अशी नोंद करुन पालकांना परत करावे. तसेच पालकांकडुन एक हमीपत्र भरुन घ्यावे.

काही पालक मूळगावी किंवा अन्य जागी स्थलांतर झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक हजर झाले नाही, तर त्यांना पुन्हा पुढची तारीख देण्यात यावी. तसा ‘एस.एम.एस.’ त्यांना पाठविण्यात यावा. दुस-यांदा दिलेल्या तारखेला पालक उपस्थित न राहिल्यास तिस-यांदा तारीख देण्यात यावी, अशाप्रकारे पालकांना तीन वेळा संधी देण्यात यावी.

शाळेने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु केल्यानंतर अशा तात्पुरत्या प्रवेशीत बालकांना लाभ देण्यात यावा. शाळा जेव्हा प्रत्यक्षात सुरु होईल तेव्हा या बालकांना प्रवेशित झाले, असे समजून वर्गात बसण्याची मुभा द्यावी.

शाळेने पडताळणी समितीची दिनांक व वेळ घेऊन पालकांकडून संकलित केलेली सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे घेऊन जावे व पडताळणी समितीकडून प्रवेश निश्चित करुन घ्यावेत.

शाळेने प्रतिक्षा यादीतील पालकांना सध्या बोलावू नये. त्याबाबत स्वतंत्र सूचना देण्यात येणार आहेत.

कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील पालकांना निर्बंध शिथिल झाल्यानंतर बोलाविण्याच्या देण्यात आल्या आहेत.

शाळा कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात असल्यास अथवा शाळा अन्य कामासाठी प्रशासनाने ताब्यात घेतली असल्यास, अशा शाळांनी प्रतिबंधित क्षेत्रातील अटी शिथिल झाल्यानंतर प्रवेशाबाबत कार्यवाही करण्यात यावी. या अनुषंगाने

एन.आय.सी स्तरावरुन आवश्यक बदल करण्यात येत आहे. सदर सुविधा शाळेला दिनांक २४.०६.२०२० पर्यत उपलब्ध होतील.

२. पालकांसाठी मार्गदर्शक सूचना

शाळेचा प्रवेशाबाबतचा मेसेज आल्यानंतर त्या दिनांकास सर्व मूळ आवश्यक कागदपत्रे व एक छायांकीत प्रत घेऊन शाळेत उपस्थित रहावे व कागदपत्रांच्या पडताळणीस अधीन राहुन तात्पुरता प्रवेश घ्यावा, तसेच हमीपत्र शाळेला द्यावे.

शाळेने दिलेल्या दिनांकास उपस्थित राहता येणे शक्य नसल्यास, शाळेला तसे कळविण्यात यावे व पुढील दिनांकाची मागणी करावी.

शाळेच्या ‘मेसेज’वर अवलंबून न राहता ‘आरटीई’ पोर्टलवर बालकांचा अर्जक्रमांक टाकून प्रवेशाच्या दिनांकाची खात्री करावी.

आरटीई पोर्टलवर पालकांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करावे.

पडताळणी समितीस कागदपत्रे चुकीची आढळुन आल्यास व आरटीई पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास हमीपत्रातील अटीप्रमाणे कारवाई करण्यात येईल. शाळेचा प्रवेशाबाबत मेसेज / फ़ोन / ऑनलाईन पोर्टलवर प्रवेशाचा दिनांक दिसून आल्यास त्याच दिनांकास शाळेत प्रवेशासाठी जावे, तोपर्यत शाळेत अथवा पडताळणी केंद्रावर गर्दी करु नये.

३. पडताळणी समितीने करावयाची कार्यवाही

आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांवर प्रवेशाबाबत देखरेख करावी. संबंधित पत्रातील सूचनेप्रमाणे शाळेद्वारे कार्यवाही केली जात असल्याची खात्री करावी. शाळेला व पालकांना मार्गदर्शन आवश्यकतेनुसार वेळोवेळी यथायोग्य मार्गदर्शन करावे.

प्रत्येक शाळेला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिनांक व वेळ देण्यात यावी.

कागदपत्रांची पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावे, तशी नोंद ऑनलाईन पोर्टलवर करावी.

पडताळणीमध्ये कागदपत्रे चुकीची आढळुन आल्यास किंवा पालकांनी ऑनलाईन पोर्टलवर चुकीची माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास यापूर्वी वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार कारवाई करण्यात यावी.

प्रवेशाबाबत अडचण उद्भवल्यास किंवा शाळेने सहकार्य न केल्यास एस.एस.सी. बोर्डाच्या शाळांसाठी “बृहन्मुंबई महानगरपालिका उपशिक्षणाधिकारी (खासगी प्राथमिक शाळा विभाग), यांचे कार्यालय, करीरोड, मुंबई” येथील संबंधित विभाग निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

तसेच अन्य बोर्डाच्या शाळांसाठी “शिक्षण निरीक्षक, महाराष्ट्र शासन (उत्तर, दक्षिण व पश्चिम) आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय, चर्नीरोड (पश्चिम)” येथे संपर्क साधावा.