भाजपातील आयारामांना अच्छे दिन! आगामी काळात राज्याचे राजकारण ‘गुजरात पँटर्न’च्या दिशेने

पुन्हा राज्यात महाविकास आघाडी सरकारने जवळपास दोन वर्षांचा पल्ला पूर्ण करत आणल्याने आगामी राजकारणाची दिशा म्हणून सुनील देशमुख यांच्या सारखे काहीजण माघारी फिरत भाजपातून जाण्यास सुरूवात झाली होती. नाना पटोले यानी कॉंग्रेसमध्ये परत यात मोठा घरवापसीचा कार्यक्रम तयार करून नेत्यांना परत येण्याचे आवाहन करण्यास सुरूवात केली होती.

  मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला. त्यातून आगामी काळात राज्याचे राजकराण ‘गुजरात पँटर्न’च्या दिशेने जाणार असल्याचे संकेत मिळाले असल्याचे मत राजकीय निरिक्षक व्यक्त करत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यात गेल्या काही दिवसांत अन्य पक्षातून भाजपामध्ये आलेल्यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.

  तसेच नव्याने ‘सहकार’ खाते निर्माण करत त्याची जबाबदारी स्वत: गृहमंत्रालय सांभाळणारे अमित शहा यांच्या कडेच ठेवण्यात आल्याने येत्या कालखंडात राज्यातील सहकार क्षेत्रात वर्षानुवर्ष कार्यरत असणा-यांना ‘वेगळा संदेश’ वखुबी देण्यात आल्याचे देखील मानले जात आहे. या पाठीमागे केंद्रस्थ नेत्यांचा दूरदृष्टीच्या राजकारणाचा परिचय होत असून येत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावर केंद्रीय नेत्यांची नजर लागल्याचे संकेत मिळाले आहेत.

  आयारामांना पायघड्या

  राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांचा समावेश झाला. यातील तिघेजण गेल्या काही वर्षात भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना केंद्रात मानाचे पान देण्यात आले आहे. त्याचवेळी प्रकाश जावडेकर यांच्या सारख्या निष्ठावान भाजप नेत्याला राजीनामा देवून मंत्रिमंडळाबाहेर जावे लागले आहे.

  नितीन गडकरी यांच्याकडील प्रभावी काम करत असलेल्या लघु व सुक्ष्म उद्योग विकास खात्याची जबाबदारी काढून ती नारायण राणेंसारख्या राज्यातील नव्या शिलेदाराकडे देण्यात आली आहे. या घटनातून आयारामाना भविष्यात अच्छेदिन येणार असल्याचे संकेत मिळाले आहेतच. शिवाय वाट पाहून थकलेल्या आयारामांना आता घरवापसीचे विचार नकोत हे देखील पटवून देण्यात आले आहे असे मानले जात आहे.

  माजी दिग्गज नेत्यांमागे चौकशीचे शुक्लकाष्ठ

  तर दुसरीकडे चाळीस वर्ष पक्षाची सेवा केल्यानंतर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेल्या नाथाभाऊ खडसे यांच्यासह कुंटूंबियाना सक्त वसुली संचालनालयाने चौकशीच्या फे-यात घेतले आहे. या महत्वाच्या घडामोडीतून राज्याच्या राजकारणाने कूस बदलण्यास सुरूवात केल्याचे मानले जात आहे. भाजपची साथ सोडल्यानंतरही खडसे यांचा वनवास कमी होताना दिसत नाही, हा देखील राजकीय वर्तुळात काम करणा-यांना वेगळा संदेश असल्याचे मानले जात आहे.

  भाजपात मोठे इनकमिंग

  २०१४च्या लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांपूर्वी भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात अन्य पक्षांतून दिग्गज नेत्यांची, घरंदाज राजकीय घराण्यांची आवक होण्यास सुरूवात झाली. त्यात सोलापूरातून मोहिते पाटील, निंबाळकर, साता-यातून साक्षात छत्रपतींचे वंशज उदयनराजे भोसले, सहकार क्षेत्रातील दिग्गज लोणीचे विखे पाटील, नगर जिल्ह्यात कोल्हे, पाचपुते, पिचड, कोल्हापूरातून शाहू छत्रपतींचे वंशज संभाजीराजे, माजी खासदार महाडिक, इंदापूरात बारामतीच्या शेजारी असणारे हर्षवर्धन पाटील, नाशिक जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे घराणे, नंदूरबारमध्ये विजयकुमार गावित, कोकणातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे माजी खासदार पूत्र निलेश, विद्यमान आमदार नितेश, रत्नागिरीतून प्रसाद लाड, कट्टर राणे समर्थक राजन तेली, रायगडमधील प्रविण दरेकर असे किमान चार डझन नेते आयात करून निवडणुकांच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. त्यातील काही निवडणुका हारले मात्र भाजप मध्ये ज्या हेतूने या गोतावळा जमा केला होता त्याला राज्यात महाविकास आघाडीचे नवे राजकीय समिकरण तयार झाल्याचे ब्रेक लागला होता.

  पश्चिम बंगालचा कित्ता

  त्यानंतर बराच काळ निघून गेला. आता पश्चिम बंगाल मध्ये ममता बँनर्जी यांनी एकाकीपणे भाजपच्या शक्तिला मात देत आपली सत्ता टिकवलीच शिवाय सोडून गेलेल्या बहुतांश नेत्यांना पुन्हा माघारी घेवून शक्ती वाढविण्यास सुरूवात केल्यांने महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात जमा केलेल्या पाहूण्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत असे निरिक्षकांचे मत आहे. कारण पश्चिम बंगाल मध्ये भाजपमध्ये आलेल्यांची घरवापसी सुरू झाल्यानंतर राज्यातील अन्य पक्षांतून विशेषत: दोन्ही कॉंग्रेस मधून आलेल्यांना ‘गड्या आपला जुना पक्ष बरा’ असे वाटू लागणे स्वाभाविक होते.

  पुन्हा राज्यात महाविकास आघाडी सरकारने जवळपास दोन वर्षांचा पल्ला पूर्ण करत आणल्याने आगामी राजकारणाची दिशा म्हणून सुनील देशमुख यांच्या सारखे काहीजण माघारी फिरत भाजपातून जाण्यास सुरूवात झाली होती. नाना पटोले यानी कॉंग्रेसमध्ये परत यात मोठा घरवापसीचा कार्यक्रम तयार करून नेत्यांना परत येण्याचे आवाहन करण्यास सुरूवात केली होती.

  आयारामांसमोर ‘घी और बडगा’

  त्यामुळे दोन वर्षापासून भाजपात आलेल्या या आयारामांना केवळ ईडीच्या संभाव्य चौकशीचा धाक घालून थांबविणे अशक्य आहे, तर त्यांचे राजकीय पुनर्वसन होणेही तितकेच आवश्यक आहे भाजप नेतृत्वाने वेळीच जाणले आहे. हेच हेरून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.

  याशिवाय ‘विना सहकार नही उध्दार’ हा मंत्र माहिती असणा-या आयारामांना आता परतीच्या वाटा बंद झाल्या आहेत हा संदेश देण्यात आला आहे. इतकेच नव्हे नव्याने काही जणांना आता भाजपाकडे आल्याशिवाय ‘सहकाराविना विकास होणार नसल्याचा’ साक्षात्कार होण्यास लवकरच सुरूवात होणार आहे. त्यामुळे या आयारामांचा परत जाण्याचा मार्ग कायमचा बंद करून त्यांना ‘इथेच ठोका तंबू’ असे म्हणत दिलासा देण्याचा प्रयत्न देखील भविष्यात होणार आहे असे केंद्रातील राजकीय उलथापालथीचा अन्वयार्थ असल्याचे जाणाकार सांगत आहेत.