महाराष्ट्र सोशल फोरमच्या चर्चा संवादात भूक, भीती आणि भ्रम या सत्ताधाऱ्यांच्या आयुधाविरोधात एकीचा निर्धार!

मुंबई :भूक, भीती आणि भय या आयुधांचा वापर करून सध्याचे सत्ताधारी देशातील गरिबाबरोबर वागत आहेत. त्याविरोधात सर्व पुरोगामी चळवळींनी एकत्र येऊन, एकत्र चालून आपले धेय्य गाठेपर्यंत प्रयत्न करण्याचा निर्धार महाराष्ट्र सोशल फोरमच्या दुसऱ्या दिवसाच्या चर्चा संवादात सर्वांनी व्यक्त केला.

आज दुसऱ्या दिवशी अंनिसचे अविनाश पाटिल, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, मासुम संस्थेच्या मनीषा गुप्ते, युवा संस्थेचे मिनार पिंपळे आणि उल्का महाजन यांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर महाराष्ट्राशी संवाद साधला. सर्व वक्त्यांनी शहीद नरेंद्र दाभोलकर यांचे स्मरण केले. त्यांचे खुनी सापडत नाही, सरकार त्याबद्दल गंभीर नाही याबद्दल सर्वांनी नाराजी व्यक्त केली. जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनाही सर्वांनी पाठिंबा दिला.

या चर्चा संवादात अविनाश पाटील यांनी मांडले की, चळवळीतील कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका न घेता काम करावे, आपण केलेल्या कामांवर हक्क सांगायला हवा, शिवाय आपल्या कामाचा निवडणुकीच्या राजकारणावर प्रभाव पडायला हवा.

प्रतिभा शिंदे यांनी महाराष्ट्र सोशल फोरम ची सध्याची प्रक्रिया पूर्वीच्या विषमता निर्मूलन शिबिराची आधुनिक आवृत्ती ठरावी, त्यातून नवे कार्यकर्ते घडावेत आणि चळवळींना बळ मिळावे, अशी इच्छा व्यक्त केली. मनीषा गुप्ते यांनी चळवळींमधील संवादाची भाषा अधिक लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक व्हावी, नव्या पिढीला सतत नव्या कार्यक्रमाची गरज असते, त्यामुळे पुरोगामी चळवळींनी नवे कार्यक्रम नव्या पिढीला दिले पाहिजेत,अशी अपेक्षा व्यक्त केली. १९९० नंतर नव्या चळवळी जन्माला आल्या त्यांनाही सोबत जोडून घ्यावे, अशी महत्वाची सूचना त्यांनी मांडली. राष्ट्र सेवा दल या संघटना चळवळींच्या आईची भूमिका बजावावी असेही त्या यावेळी म्हणाल्या.

मिनार पिंपळे यांनी यावेळी म्हणाले की, तरुण पिढीला काय काय भावते याचा चळवळींनी अभ्यास करायला हवा, त्या प्रमाणे कल्पक, अभिनव कार्यक्रम द्यावे आणि तरुण पिढीला चळवळीशी जोडून घ्यावे. सध्याच्या सत्ताधाऱ्याशी सामना करताना नव्या तंत्रज्ञानाला , कौशल्यांना आत्मसात करून पुढे जावे लागेल. राजकीय प्रक्रियेला दुर्लक्षून चालणार नाही.
उल्का महाजन यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या की, भूक, भीती आणि भ्रम हा सध्याच्या सत्ताधारी लोकांचा अजेंडा आहे. त्याचा सामना करताना आपण एक होऊन गरिबांच्या हिताचे राजकारण पुढे नेले पाहिजे. राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी या संवादाचा समारोप करताना मांडले की, लोक एकत्र येण्यासाठी आसुसलेले आहेत. करोना काळात गावी निघालेल्या कामगारांची पावलं आशेच्या गाड्याचे एक चाक आहे. तर दुसरं चाक आपली एकी आहे. त्या पावलांना शब्द देऊयात. यावेळी गणेश देवी यांनी सर्वांना पॉलिटिक्स ऑफ टुगेदरनेस ची हाक दिली.

आज महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या प्रश्नांवर विविध गटांत चर्चा झाली, त्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, अन्न सुरक्षा, पर्यावरण, कामगार कायदे,शेती या कळीच्या प्रश्नावर ऑनलाइन चर्चा झाली. या कर्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन मते यांनी केले.