राज्यात गेल्या २४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची लागण

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात गेल्या २४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गेल्या २४ तासांत ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबई : पोलीस दलातही कोरोनाची लागण होण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या या कोरोना योद्धांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यात गेल्या २४ तासांत ५११ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच गेल्या २४ तासांत ७ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातील पोलीस दलात आतापर्यंत १६ हजार ९१२ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी १३ हजार ७१९ पोलीस बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यातील पोलीस दलात ३ हजार २० अँक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात १७३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सामान्य नागरिकांबरोबर वैद्यकीय कर्मचारी, पोलीस आणि संरक्षण दलातील जवानांना देखील कोरोनाची लागण होत असल्याने चिंतेत भर पडत आहे.