लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण खोळंबले; पुढील एवढ्या दिवसांनी सुरु होणार लसीकरण मोहीम – महानगरपालिकेने केले स्पष्ट

गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती; मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.

    मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत असताना दुसरीकडे राज्यात मोठ्याप्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. मात्र केंद्रसरकारकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्याने मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली आहे. दरम्यान, लसींचा साठा शिल्लक नसल्याने शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. तसेच पुढील दोन दिवस लस येण्याची शक्यताही कमी आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हाच लसीकरण मोहीम सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

    १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस घेतली आहे. गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती; मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले.

    गुरुवारी महापालिकेच्या २८३ केंद्रांवर जेमतेम १४ हजार लोकांना लस देण्यात आली. तर खासगी लसीकरण केंद्रांमध्ये २८ हजार लोकांना लस देण्यात आली. सरकारच्या २० केंद्रांमध्ये १६०० लोकांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण ४५ हजार लोकांना लस देण्यात आली.