अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, विश्वासू सहकाऱ्याला ED ची नोटीस, आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँडरिंग प्रकरणी ही नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

    मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयानं मनी लाँडरिंग प्रकरणी ही नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे.

    बजरंग खरमाटे हे अनिल परब यांचे विश्वासू मानले जातात. खरमाटे हे आरटीओ अधिकारी आहेत. त्यांना आज चौकशीसाठी कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. ईडीकडून खरमाटे यांना बजावलेलं हे पहिलं समन्स आहे. गेल्या आठवड्यात अनिल परब यांनाही चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस ईडीनं बजावली होती. आता खरमाटे यांना आलेल्या नोटीशीमुळे परब यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं चित्र आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात 30 ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर येथील घरावर ईडीनं छापेमारी केली. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. या छापेमारी दरम्यान ईडीनं काही कागदपत्रंही ताब्यात घेतली आहे.

    चौकशीसाठी अनिल परब गैरहजर

    ईडीनं अनिल परब यांना नोटीस बजावली होती. नोटीस दिल्यानंतर त्यांना 31 ऑगस्टला ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र चौकशीसाठी अनिल परब उपस्थित राहिले नाहीत. मंत्रीपदाची जबाबदारी असल्यानं काही कामं आधीच ठरवण्यात आली आहेत. त्यामुळे चौकशीसाठी हजर राहू शकणार नाही. असं त्यांनी ईडीला कळवलं आहे.