Corona Updates : लोकल सेवेपेक्षा लग्न सोहळे, पब पार्टी, मार्केटमधील गर्दीमुळे रुग्ण संख्येत वाढ; निर्बंध कठोर करण्याबाबत पालिका वेट अँड वॉचच्या भूमिकेत

सध्या रोज २० ते २२ हजारांच्या घरात चाचण्या होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच रस्त्यावर गर्दी वाढू लागली आहे. झोपडपट्टी पेक्षा हायराईज इमारती सोसायट्यांमध्ये कोरोनाला हरवण्यासाठी योग्य तसे नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

    मुंबई : मुंबईत वाढणारी रुग्णसंख्या ही लोकल सेवेपेक्षा लग्नसोहळे, पब पार्टी, मार्केटमधील गर्दीमुळे वाढत आहे. त्यामुळे काही भागात कठोर निर्बंध करण्याबाबत सध्या दोन ते तीन दिवस पालिका कोरोना रुग्ण संख्या वाढीवर लक्ष ठेवून आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

    नोव्हेंबर, डिसेंबर २०२० मध्ये रोज मिळणारी रुग्ण संख्या ४०० ते ५०० च्या घरात होती. परंतु लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत असून गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण संख्या १,५०० च्या घरात पोहोचली आहे. रुग्ण संख्येत वाढ होण्यामागे मुख्य कारण म्हणजे कोरोना चाचण्यांच्या संख्येत केलेली वाढ.

    सध्या रोज २० ते २२ हजारांच्या घरात चाचण्या होत असल्याने रुग्ण संख्येत वाढ दिसून येत आहे. तसेच लॉकडाऊनचे नियम शिथिल करताच रस्त्यावर गर्दी वाढू लागली आहे. झोपडपट्टी पेक्षा हायराईज इमारती सोसायट्यांमध्ये कोरोनाला हरवण्यासाठी योग्य तसे नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे.

    कोरोना रुग्ण वाढीस लोकल सेवा कारणीभूत नसून लग्न सोहळा, पब, मार्केट मध्ये होणारी गर्दी यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दरम्यान, या ठिकाणी कठोर निर्बंध करण्याबाबत पुढील तीन ते चार दिवस रुग्ण संख्या वाढीवर नजर ठेवली जाणार आहे. त्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

    दरम्यान, बाजारात, मार्केट ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, त्या ठिकाणी पालिकेच्या पथकाची गस्त वाढवल्याचे ते म्हणाले.