लोकल प्रवासाच्या गर्दीमुळे नव्हे तर उच्चभ्रू वर्गातील बेफिकिर नागरिकांमुळे रुग्णवाढ- अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी

सध्याची रुग्णवाढ लोकलप्रवासातील गर्दीमुळे झाली आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. लोकलमधील गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगचा उडालेला फज्जा, मास्क न वापरणारे अनेकजण यामुळे १५ दिवसांनंतर रुग्णवाढ झाल्याचे बोलले जात आहे. पण ही रुग्णवाढ उच्चभ्रू सोसायटीमधील आहे. उच्चभ्रू वर्गातील लोक लोकलने प्रवास करत नाहीत आणि प्रवास करणारे असतील तर त्यांची संख्या नगण्य आहे.

  मुंबई: मुंबईत वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या लोकलप्रवासाच्या गर्दीमुळे नव्हे, तर उच्चभ्रू वर्गातील आहे. लोकल प्रवासातील गर्दीमुळे रुग्णसंख्या वाढली असती तर याच्याहून अधिक झाली असती. त्यामुळे सध्या असणारी रुग्णवाढ बेफिकिरीतून झाली आहे, असे मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मात्र वाढणाऱ्या रुग्णसंख्येला तोंड देण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असून सप्टेंबर २०२० प्रमाणे सर्व तयारी करण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  कोरोना संसर्गबाधितांची दररोजची संख्या ३५० पर्यंत घसरली असतानाच गेल्या आठवड्यात ती टप्प्याटप्प्याने हजारापर्यंत पोहोचली. त्यामुळे प्रशासनासह मुंबईकरांपुढील चिंता वाढली आहे. पुन्हा लॉकडाऊन होणार की इतर निर्बंध कडक होणार, अशीही भीती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी जनसंवादात आणखी आठ दिवसाचा अवधी दिला आहे. त्यामुळे आठ दिवसांनंतर मुंबईतील स्थिती कशी असेल, अशी चिंता सर्व सामान्यांना भेडसावत आहे.

  सध्याची रुग्णवाढ लोकलप्रवासातील गर्दीमुळे झाली आहे, असा सर्वसामान्यांचा समज आहे. लोकलमधील गर्दीमुळे सोशल डिस्टनसिंगचा उडालेला फज्जा, मास्क न वापरणारे अनेकजण यामुळे १५ दिवसांनंतर रुग्णवाढ झाल्याचे बोलले जात आहे. पण ही रुग्णवाढ उच्चभ्रू सोसायटीमधील आहे. उच्चभ्रू वर्गातील लोक लोकलने प्रवास करत नाहीत आणि प्रवास करणारे असतील तर त्यांची संख्या नगण्य आहे. सर्वासामान्यांना प्रवेश नव्हता तेव्हा लोकलप्रवाशांची संख्या ८ लाख होती आणि वेळेचे बंधन घालून सर्वसामान्यांना लोकलचे दरवाजे खुले झाल्यानंतर प्रवासीसंख्या २२ लाख झाली आहे. म्हणजे १४ लाख प्रवासी वाढल्यानंतर त्यांच्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढली असे गृहीत धरले तर ती संख्या अजून मोठी झाली असती. त्यामुळे ही रुग्णवाढ नियम झिडकारल्याने आणि बेफिकिरीतून झाली आहे, असे काकाणी म्हणाले.

  त्रिसूत्री महत्त्वाची

  लस सोडली तर कोरोनावर कोणतेही खात्रीचे औषध नाही. त्यामुळे मास्क हाच त्यावर खात्रीचा इलाज आहे. नाका-तोंडावर मास्क परिधान करणे, सोशल डिस्टन्स राखणे आणि सॅनिटायझर वापरणे या त्रीसूत्रीचा वापर केला तर कोरोनाला निश्चितच प्रतिबंध होईल. पण कोरोना नियंत्रणात आला म्हणजे संपला असे समजून लोक निष्काळजीपणे वावरू लागले आणि त्याची परिणती रुग्णवाढीत झाली, असे काकाणी म्हणाले.

  बाधितांचे प्रमाण कमीच

  सध्या रुग्णवाढ दिसत असली तरी त्यात बाधितांचे प्रमाण १८ टक्के आहे, तर ८२ टक्के लोक लक्षणे नसलेले आहेत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, पण खबरदारी तितकीच महत्त्वाची आहे. पालिका प्रशासन याबाबत सतर्क असल्याने बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण आता घटले आहे, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

  पालिका सज्ज
  गणेशोत्सवानंतर सप्टेंबर २०२० मध्ये रुग्णवाढ झाल्यानंतर जी तयारी मुंबई महापालिका प्रशासनाने केली होती, त्याच पद्धतीची तयारी आताही पालिका प्रशासनाने केली आहे. कोरोना केअर सेंटर आणि कोरोना जम्बो सेंटरमध्ये सध्या बेड, आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर २५ टक्के कार्यरत आहेत. ७५ ते ८० टक्के वापरात नाहीत. त्यांना वापरात आणण्यासाठी जोरदार तयारी चालली आहे.
  ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा आहे. आजच पालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांनी महापालिका क्षेत्रातील खासगी प्रयोगशाळा, ऑपरेशन्स, खासगी दवाखाने, महापालिकेचे दवाखाने यांची एक बैठक घेतली. त्यांना विविध प्रकारच्या सूचना दिल्या. चाचणीसाठी आलेल्यांचे मोबाईल नंबर, पॅनकार्ड नंबर नोंद करून घेणे, त्यांची चाचणी योग्य प्रकारे करणे, त्यात कोणतीही हयगय होता नये आणि त्याचा अहवाल २४ तासांच्या आत मिळेल असे व्यवस्था करण्याची सक्त सूचना आयुक्तांनी दिल्याचे काकाणी यांनी सांगितले.