bmc

मुंबई: कृषी कायद्या विरोधात मंगळवारी भारत बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईत देखील कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय विविध  पक्ष आणि संघटनांनी घेतला आहे. मात्र, या आंदोलनात पालिका आणि राज्य सरकार रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी व नर्सेस सहभागी होणार नसल्याचे यूनियनचे म्हणणे आहे.

मागील काही महिन्यांपासून कोविड महामारीचा सामना करावा लागत असल्याने रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास होवू नये याकरीता या बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे युनीयनकडून सांगण्यात आले.

राज्य सरकराच्या अंतर्गत येत असलेले जे.जे, कामा, सेंट जॉर्ज तसेच गोकुळ तेजपाल रुग्णालय यासह पालिकेचे प्रमुख व उपनगरीय २६ रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी व नर्सेस मंगळवारी असलेल्या भारत बंद मध्ये सहभागी होणार नाहीत.

याबाबत म्युनिसिपल मजदूर युिनयनचे सहचिटणीस प्रदिप नारकर यांनी सांगीतले की, पालिका रुग्णालयात तब्बल ३५ हजार  डॉक्टरांसह इतर चतुर्थश्रेणी कर्मचारी  कार्यरत आहेत. यात चतुर्थश्रेणी कर्मचारी व नर्सेस या बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.

यूनियनचा शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र, परंतु आमचे कर्मचारी या बंदमध्ये सहभागी झाल्यास रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना अडचणींना तोंड द्यावे लागेल. शिवाय कोरोना रुग्णांनाही यामुळे नाहक त्रास सहन करावा लागले. म्हणून बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नारकर म्हणाले.

कोविडमुळे दाखल असलेल्या रुग्णांचे बंदमुळे हाल होतील.  त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागेल.  ज्यामुळे भारत बंद मध्ये सहभागी नसल्याचे महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण विभाग बदली कर्मचारी संघटनेचे राज्य सचिव कृष्णा क्षीरसागर यांनी सांगीतले. मुंबईतील जे.जे. कामा,  सेंट जॉर्जे व जी.टी रुग्णालयातील एकूण १०० चतुर्थश्रेणी कर्मचारी व राज्य नर्सेस फेडरेशनशी संलग्न असलेली ३४०० नर्सेस भारत बंद मध्ये सहभागी होणार नसल्याचे क्षीरसागर यांनी सांगीतले.