इंद्राणीला कोणताही गंभीर आजार नाही; उच्च न्यायालयात कारागृह प्रशासनाची प्रतिज्ञापत्रामार्फत माहिती

इंद्राणीला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ती भायखळा महिला कारागृहात शिक्षा भोगत आहे. आपण आजारी असून आजारपणाच्या कारणास्तव तसेच खटल्याच्या गुणवतेच्या आधारावर आपली सुटका करावी अशी मागणी करणारा जामीन अर्ज इंद्राणीने दाखल केला होता.

    मुंबई : शीना बोरा हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीला कोणताही गंभीर आजार झालेला नसून तिची प्रकृती ठणठणीत आहे. त्यामुळे तिची कारागृहाबाहेर उपचार करण्याची गरज नाही अशी माहिती प्रतिज्ञापत्रामार्फत भायखळा कारागृह प्रशासनाच्यावतीने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली.

    २०१२ मध्ये उच्चभ्रू कुटुंबातील शीना बोराची (२४) हत्या करण्यात आली होती. त्यात तिची आई इंद्राणी मुखर्जी, तिचा पहिला पती संजीव खन्ना आणि ड्रायव्हर शामवर राय यांच्या हात असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर इंद्राणीला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ती भायखळा महिला कारागृहात शिक्षा भोगत आहे. आपण आजारी असून आजारपणाच्या कारणास्तव तसेच खटल्याच्या गुणवतेच्या आधारावर आपली सुटका करावी अशी मागणी करणारा जामीन अर्ज इंद्राणीने दाखल केला होता. त्यावर न्या. प्रकाश नाईक यांच्यासमोर सोमवारी सुनावणी पार पडली.

    मागील अनेक वर्षापासून आपण कारागृहात वेळ घालवल्यामुळे आपल्याला मेंदूचा विकार जडला असल्याचे अर्जातून म्हटले होते. त्यावर अतिरिक्त सरकारी वकील योगेश नाखवा यांनी बाजू मांडताना कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी न्यायालयात याबाबतचा अहवाल सादर केला असून इंद्राणीला दोन वेळा जे. जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यातच तिला कोणताही गंभीर आजार झालेला नसून तिची प्रकृती ठणठणीत असल्याचेही म्हटले असल्याचेही नाखवा यांनी सांगितले. त्यांची बाजू ऐकून घेत न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.