राज्यातील पाच वर्षाखालील लहानग्यांना एन्फ्लूएंजा प्रतिबंधक लस पावसाळ्यापूर्वी द्यावी; दोन्ही टास्कफोर्स सदस्यांचा मुख्यमंत्र्याना सल्ला…

बैठकीत झालेल्या चर्चाबाबत माहिती देताना आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, (आयपीए) भारतीय बाल साथरोग संस्था यांनी याबाबत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना अश्या प्रकारे प्रतिबंधक लस देवून सुरक्षा देण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे.

  मुंबई : राज्याच्या कोरोना उपाय योजनावर देखरेख करणा-या टास्कफोर्स आणि नव्याने लहान मुलांच्या संसर्गाबाबत लक्ष देण्यासाठी नेमण्यात आलेल्या टास्क फोर्स सदस्यांनी राज्यातील लहानग्यांना एन्फ्लू एंजा लस पावसाळ्यापूर्वी देण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत दूरदृश्य माध्यमातून झालेल्या संयुक्त बैठकीत दोन्ही कृती दलाचे तज्ज्ञ उपस्थित होते.

  अनावश्यक चाचण्याचे प्रमाण कमी होईल

  यावेळी फ्लू सारख्या रोगाचा प्रतिबंध करणारी लस देण्याचा सल्ला देताना तज्ज्ञांनी सांगितले की, त्यामुळे पावसाळ्यात होणा-या सर्दी पडश्यासारख्या आजारात अनावश्यक चाचण्या करण्याचे प्रमाण कमी होईल आणि कोरोनाच्या भितीचे वातावरण टाळता येवू शकेल.

  लसीकरण मोहिम राबविण्याची गरज नाही

  या बैठकीत झालेल्या चर्चाबाबत माहिती देताना आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, (आयपीए) भारतीय बाल साथरोग संस्था यांनी याबाबत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना अश्या प्रकारे प्रतिबंधक लस देवून सुरक्षा देण्याचा सल्ला दिल्याचे सांगितले आहे. याबाबतची लस दोन प्रकारच्या एन्फुएन्झा आजारासाठी दिली जाते जी खाजगी बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. यासाठी लसीकरण मोहिम राबविण्याची गरज नसून पालकांना दिड ते दोन हजार रुपयांत ही लस सहजपणे उपलब्ध होवू शकते असे या तज्ज्ञांनी सांगितले आहे.

  सहा महिन्यांकरीता लस किमती नियंत्रणात

  राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ संजय ओक यांनी मुख्यमंत्र्याना बैठकीत सांगितले की, एन्फ्लूएन्जा लस प्राधान्याने द्यावी असा आमचा सल्ला आहे, जरी ही लस काही प्रमाणात महाग असेल आणि केवळ मध्यम किंवा उच्च मध्यमवर्गीयांना परवडणारी असेल तरी तिची किंमत नियंत्रणात आणून सहा महिन्यांकरीता ती बालकांना देता येवू शकेल.

  फ्लूच्या आजारात कोरोनासारखीच लक्षणे

  यावेळी डॉ सुहास प्रभू यानी सांगितले की फ्लूच्या आजारात साधारणत: कोरोनासारखीच लक्षणे दिसतात त्यामुळे अनावश्यक चाचण्या कराव्या लागतील आणि भितीचे वातावरण पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशी लस अगोदरच देण्यात आली तर या दोन्ही बाबी टाळता येवू शकतील.

  निश्चित माहिती घेवून निर्णय

  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी देखील राज्य सरकार या सल्ल्याचा गांभिर्याने विचार करेल असे सांगितले. ते म्हणाले की या मुद्यावर अधिक स्पष्टता आणि माहिती घेतली जाईल. लसीकरण हा प्रश्न नाही मात्र कोणती लस कधी आणि किती प्रमाणात द्यावी याबाबत निश्चित माहिती घेवून निर्णय घेता येईल.

  नियमीत लसीकरण सुरू ठेवावे

  यावेळी दोन्ही कृती दलाच्या सदस्यांनी सांगितले की ज्या बालकांचे नियमीत लसीकरण कोविड मुळे होवू शकले नसेल त्यांच्या करीता ते उपलब्ध करून द्यावे लागेल. टास्क फोर्सचे सदस्य डॉ विजय येवले म्हणाले की बीसीजी, रुबेला द्यायचे राहून गेले असेल तर अगदी कोरोनाची लक्षणे असतील अश्या बालकांना ते देण्यास हरकत नाही.