काळ्या बुरशीवरील औषधांच्या वितरणाची माहिती द्या; उच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला निर्देश

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना पाठोपाठ आता राज्यात म्युकरमायकोसिस (काळी बुरशी)च्या साथीची लागण होण्यास सुरूवात झाली आहे. यावर लागणाऱ्या औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. त्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने काळ्या बुरशीवरील औषधांच्या वितरणाची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश केंद्र आमि राज्य सरकारला दिले.

  मुंबई : देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना पाठोपाठ आता राज्यात म्युकरमायकोसिस (काळी बुरशी)च्या साथीची लागण होण्यास सुरूवात झाली आहे. यावर लागणाऱ्या औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. त्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने काळ्या बुरशीवरील औषधांच्या वितरणाची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश केंद्र आमि राज्य सरकारला दिले.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील रूग्णालयातील खाटांची कमी संख्या, रेमडेसिवीरचा तुटवडा, ऑक्सिजनचा अपुरा साठा आणि काळी बुरशी या समस्यांवर बोट ठेवत स्नेहा मरजादी यांनी अ‍ॅड. अर्शिल शहा यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर मंगळवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.

  राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही म्युकरमायकोसिस( काळी बुरशी)चे रुगेण वाढत चालले असल्याची माहिती याचिकाकर्त्यांच्यावतीने अँड. इनामदार यांनी खंडपीठाला दिली. त्यावर १ जूनपर्यंत राज्यात ५ हजार १२६ काळ्या बुरशीच्या रुग्णाची संख्या होती. या रुग्णांवर ४२ सरकारी तर ४१९ खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  दुसरीकडे, मुंबईतील हाफकीन इन्स्टिट्यूटमध्ये १० जून पर्यंत काळ्य बुरशीवरील एम्फोथेरीसीन – बी या ४० हजार कुप्यांची निर्मिती केली जाणार असून ही औषधे राज्याला मिळणार आहेत. अशी माहिती राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडताना महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी खंडपीठाला दिली.

  तसेच राज्यातील उप राजधानी नागपूरमध्ये काळ्या बुरशीचे सर्वाधिक रुग्ण असून त्यानंतर पुणे, औरंगाबाद, सोलापूर आणि नाशिक या जिल्ह्या काळ्या बुरसीचे रुग्ण आढळून आले आहेत. त्याची दखल घेत काळी बुरशी हा संसर्गजन्य रोग असून त्याला आटोक्यात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी कोरोना झालेल्या आणि विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांची अधिक देखभाल करणे आवश्यक असल्याचे खंडपीठाने सांगितले. तसेच काळ्या बुरशीबाबत केंद्र आणि राज्य सरकारने लोकांमध्ये जजनजागृती कऱणे आवश्यक आहे.

  जेणेकरून हा आजार आटोक्यात आणण्यास मदत होईल, असे अधोरेकित करत खंडपीठाने यावर उपाय म्हणून आणखी काय करता येईल त्याबाबत माहिती देण्याच्या सूचना सरकारला दिल्या. तेव्हा, देशभरात काळ्या बुरशीचे २८ हजार २५२ रुग्ण आढळले असून केंद्राने महाराष्ट्र राज्याला आतापर्यंत ९१ हजार लसींच्या कुप्या दिल्या आहेत अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी खंडपीठाला दिली. त्यावर मग महाराष्ट्रात म्युकर मायकोसिस औषधांची कमी का अशी विचारणा केंद्राला करत औषधांच्या वितारणाबाबत सविस्तर माहिती देण्याचे निर्देश केंद्राला देत खंडपीठाने सुनावणी १० जून पर्यंत तहकूब केली.

  हे सुद्धा वाचा