तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक हा अंदाज अनाठायी ; राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांची माहिती

इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही कोविड होण्याची भिती असते, पण तिसर्‍या लाटेमध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी असल्याचेही आवटे यांनी सांगितले.

  मुंबई : कोविडच्या तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांना सर्वाधिक बाधा होणार असल्याचे भाकित तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र या अंदाजाला कोणाताही ठोस शास्त्रीय आधार नसल्याची माहिती एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी दिली.

  इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रीक्सने दिलेल्या माहितीनुसार मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांनाही कोविड होण्याची भिती असते, पण तिसर्‍या लाटेमध्ये मुले सर्वाधिक बाधित होण्याची शक्यता अगदीच कमी असल्याचेही आवटे यांनी सांगितले.

  १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण होत असल्यामुळे विषाणू स्वतःमध्ये बदल करून लहान मुलांमध्ये शिरकाव करेल, असा तर्क लावण्यात येत आहे. मात्र याला कोणताही आधार नाही. लहान मुलांच्या शरीरात विषाणूंना प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे विशिष्ट रिसेप्टर विकसित झालेले नसतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये फार गंभीर आजार उद्भवताना दिसत नाहीत.

  सहा महिन्यांमध्ये पाच वर्षाखालील मुलांचे कोविडमुळे बाधित होण्याचे प्रमाण प्रत्येक महिन्यामध्ये साधारणपणे रुग्णांच्या एक ते दीड टक्के आहे. म्हणजेच मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण स्थिर आहे. त्यात कोणतीही वाढ झालेली नाही. लहान मुले जरी कोविड बाधित झाली तरी त्यांच्यामध्ये प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीचे आणि मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. मे महिन्यामध्ये १८ वर्षाखालील मुलांमध्ये मृत्यूचे प्रमाण ०.०७ टक्के एवढे आहे.

  ९० टक्के मुलांमधील कोविड सौम्य स्वरूपाचा असतो. गंभीर कोरोनाचे प्रमाण मुलांमध्ये अत्यल्प आहे. साधारणपणे १० हजार मुलांना हा आजार झाला तर त्यातील एकाचा मृत्यू होतो,असे हे सर्वसाधारण प्रमाण आहे. ज्या मुलांना इतर अतिजोखमीचे आजार आहेत त्यांच्यामध्ये अशी गुंतागुंत होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे काही मुलांना आयसीयूची गरज लागू शकते पण त्यांचे प्रमाण फार मोठे नाही.

  तिसर्‍या लाटेची शक्यता आहे पण ती कधी येईल आणि किती तीव्र असेल याबाबत अनुमान करणे कठीण आहे. तसेच तिसर्‍या लाटेमध्ये लहान मुलांमध्ये कोविडचे प्रमाण वाढू शकते या भाकिताला कोणताही शास्त्रीय आधार नसल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरणे योग्य नसल्याचे एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाचे राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले.