फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; काँग्रेसची मागणी

पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि काही राजकारण्यांचे फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं प्रकरण उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली असताना महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पेगासस कांड घडलं होतं का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.

    मुंबई : पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून देशातील पत्रकार आणि काही राजकारण्यांचे फोन टॅप करून त्यांची हेरगिरी केल्याचं प्रकरण उघड झालं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडालेली असताना महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पेगासस कांड घडलं होतं का? याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. सचिन सावंत यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. पेगासस कांड महाराष्ट्रातही झाले का? याची चौकशी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करावी अशी मागणी आहे.

    दरम्यान या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले आहे. परंतु पेगासस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत होत्या. कोणी IPS अधिकारी मंत्रालयात बसून या विषयावर काम करत होता का?, याची चौकशी करण्याची गरज आहे, असं सावंत यांनी म्हटलं आहे.

    डीजीआयपीआरचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्रायलला गेले? कोणते प्रशिक्षण त्यांनी घेतले? परत येऊन अहवाल दिला का? पेगाससशी यांचा संबंध आहे का? निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणं आश्चर्यकारक व संशयास्पद आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

    एनएसओशी पत्रव्यवहार झाला होता का?

    कितींदा कोण अधिकारी इस्रायलला गेले? एनएसओ बरोबर शासकीय मिटींग झाल्या होत्या का? एनएसओशी कोणता पत्रव्यवहार झाला होता का? हे सर्व समोर आले पाहिजे. या अगोदरही अशा चौकशीची मागणी करण्यात आली होती. काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही मागणी केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे.

    प्रकरण अत्यंत गंभीर

    देशात पेगासस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून फोन टॅपिंग व त्यात मोदी सरकारची भूमिका हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. सर्व भाजपा शासित राज्य सरकारांना या कार्यपद्धतीवर काम करण्याचे निर्देश दिले असतील. महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंग यामागे समान मानसिकता व हेतू आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.