महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये सुटीच्या दिवशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात या आठवड्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी 'मॉन्सून'चे आगमन होण्याची शक्यता असल्याची वर्दी हवामान खात्याने दिली आहे. पावसाळ्या दरम्यान मलेरिया, डेंगी, लेप्टो असे आजार

 बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात या आठवड्याच्या शेवटी किंवा त्यापूर्वी ‘मॉन्सून’चे आगमन होण्याची शक्यता असल्याची वर्दी हवामान खात्याने दिली आहे. पावसाळ्या दरम्यान मलेरिया, डेंगी, लेप्टो असे आजार मुंबईत उद्भवतात, असे यापूर्वीच्या अनुभवांवरुन अनेकदा दिसून आले आहे. हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका सातत्याने सर्वस्तरीय उपाययोजना करीत असते. यामध्ये विविध प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह आरोग्यविषयक बाबी अंमलात आणणे, क्षेत्रीय स्तरावर नागरिकांमध्ये जाणीव जागृती करणे आणि नागरिकांना वैद्यकीय सेवा सुविधा पुरविण्याच्या प्रयत्नांचा प्रामुख्याने समावेश असतो. याच अनुषंगाने ‘करोना कोविड १९’ मध्ये जसे ‘चेस द व्हायरस’ हे सूत्र घेऊन ‘फिव्हर क्लिनीक्स’च्या माध्यमातून झोपडपट्ट्यांमधून रूग्णांचा शोध घेतला गेला; त्याच धर्तीवर पावसाळी आजारांसाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहकार्याने महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये प्रामुख्याने शनिवार – रविवारच्या साप्ताहिक सुट्यांच्या दिवशी वैद्यकीय शिबिरे आयोजित करावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी आज या अनुषंगाने आयोजित एका विशेष बैठकीदरम्यान महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याला व पालिका रुग्णालयांना दिले आहेत. 

महापालिका आयुक्त श्री. इक्बालसिंह चहल यांच्या मार्गदर्शनात व ‘व्हिडीयो कॉन्फरन्सिंग’ द्वारे आयोजित एका विशेष बैठकीत पावसाळ्याच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या किंवा करण्यात येत असलेल्या विविध बाबींचा आढावा महापालिका आयुक्तांनी घेतला. याच आढावा बैठकीदरम्यान महापालिकेच्या सर्व २४ विभागातील विविध परिसरांमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये व ज्या परिसरांमध्ये यापूर्वी पावसाळी आजारांचा अधिक प्रादुर्भाव आढळून आला होता, त्या परिसरांमध्ये येत्या रविवार पासून वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश आज देण्यात आले आहेत. तसेच या शिबिरांमध्ये सहभागी होण्यास व मदत करण्यास खासगी रुग्णालये स्वत:हून पुढे आल्यास त्यांचीही मदत घ्या, असेही महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीदरम्यान आवर्जून नमूद केले आहे.वरीलनुसार आज ‘व्हिडीयो कॉन्फरन्सिंग’ द्वारे आयोजित झालेल्या बैठकीला बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त, पालिकेच्या रुग्णालयांचे अधिष्ठाता, सह आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि सार्वजनिक आरोग्य खात्यातील वैद्यकीय अधिकारी यांच्यासह संबंधित अतिवरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.