सांताक्रुझ भागातील संतापजनक प्रकार; कारवाईवेळी बीएमसी मार्शलला बोनेटवरुन फरफटत नेलं

बीएमसी मार्शलला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या कार प्रवाशांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. बोनेटवर चढून अडवणाऱ्या बीएमसी मार्शलला मुजोर कार चालकाने गाडीवर फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे.

  मुंबई : बीएमसी मार्शलला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या रस्त्यांवर विनामास्क फिरणाऱ्या कार प्रवाशांवर कारवाई करत असताना ही घटना घडली. बोनेटवर चढून अडवणाऱ्या बीएमसी मार्शलला मुजोर कार चालकाने गाडीवर फरफटत नेल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत असताना मार्शल कारच्या बोनेटवर आला होता. मुंबईतील सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला असून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

  नेमकं काय घडला प्रकार?

  विनामास्क वावरणाऱ्या कार प्रवाशांवर मुंबई महापालिकेकडून कारवाई सुरु असताना ही घटना घडली. संबंधित कार चालकाची बीएमसी मार्शलने अटवणूक केली. मात्र कार चालक न थांबता पुढे जाण्याच्या प्रयत्न करत होता. त्यामुळे मार्शल कारच्या बोनेटवर अर्धवट चढला. त्यानंतरही कार चालकाने गाडी न थांबवता त्याला गाडीसोबत तसेच पुढे फरफटत नेले. सांताक्रुझ भागातील हा प्रकार कॅमेरात कैद झाला आहे. आरोपी कार चालक किंवा बीएमसी मार्शलविषयी अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

  राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा डोकं वर काढत असताना नागरिकांकडूनही काहीशी हलगर्जी बाळगली जात आहे. विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांववर महापालिकेने कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबई महापालिकेकडून लोकल प्रवासात मास्कचा वापर न करणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी विशेष मार्शल नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे, काही क्लीन अप मार्शलची वर्तणूक योग्य नसल्याचं सांगत याबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही महिन्यांपूर्वी महत्त्वपूर्ण सूचना केल्या होत्या.

  किशोरी पेडणेकर नेमकं काय म्हणाल्या होत्या?

  यामध्ये क्लीन अप मार्शल परिधान करत असलेल्या गणवेशावरील कोटवर संबंधित क्लीन अप मार्शलची ओळख दर्शविणारा क्रमांक, संबंधित विभागाचे नाव तसेच संबंधित कंत्राटदार याची माहिती द्यावी, क्लीन-अप मार्शल परिधान करीत असलेल्या कोटच्या समोरील आणि मागील बाजूस ठळक अक्षरात वाचता येईल, अशा पद्धतीने माहिती दिसली पाहिजे. जेणेकरून ठळकपणे त्याची ओळख सर्वांना समजेल तसेच बोगस क्लीन-अप मार्शल काम करीत असेल तर त्याचा सुद्धा शोध घेणे सहज सुलभ होईल, असं त्या म्हणाल्या होत्या.